जैनांच्या अटकेचे थरार नाट्य... 

जैनांच्या अटकेचे थरार नाट्य... 

जळगाव ः पोलिस अधीक्षक कार्यालयात 10 मार्च 2012 रोजी दिवसभर सामसूम होती. अप्पर अधीक्षक इशू सिंधूंच्या केबीनकडे कोणासही जाण्यास परवानगी नव्हती. सायंकाळी पावणेसात वाजता सिंधूंनी तत्कालीन गुन्हे शाखेचे निरीक्षक डी. डी. गवारे यांना बोलावून घेतले. दोघांची सव्वा तास बंदद्वार चर्चा सुरू असतानाच गुप्त सूत्रांन्वये सिंधूंना फोन आला, की "दादांच्या बंगल्यातून एक पांढऱ्या रंगाची कार सुसाट वेगात बाहेर पडली अन्‌ ती सुरत लाइन रेल्वे गेटकडे निघून गेली आहे.' तेथूनच सुरेशदादा जैन यांच्या अटकेचे थरारक नाट्य सुरू झाले, ते मध्यरात्री त्यांच्या अटकेनंतरच थांबले. पोलिस दलाने सिंधूंच्या नेतृत्वात अतिशय कसब पणाला लावून जिल्ह्याबाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या जैन यांना गजाआड केले. 

त्या दिवशी सायंकाळी सिंधूंशी झालेल्या चर्चेनंतर श्री. गवारे कागदाचं चिटोरं घेऊन दालना बाहेर पडले. गुन्हे शाखेची संपूर्ण टीम, गोपनीय विभागाचे कर्मचारी, आरसीपीचे नवखे पोलिस असे दुचाकींवर शहरातून बाहेर जाणाऱ्या विविध मार्गांवर वाहने घेऊन बाहेर पडले. इकडे वायरलेसद्वारे सर्व पोलिस ठाण्यांना गाडीचे वर्णन आणि नंबर देवून असेल तिथे थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दादांची ती गाडी धरणगाव रेल्वे गेट बंद असल्याने त्या ठिकाणी अडवली गेली. निरीक्षक दादाराव शिनगारे वायरलेसवर माहिती सांगणार, इतक्‍यात डी. डी. गवारेंचे सुसाट वाहन त्या गाडीच्या मागे येऊन थांबले... गवारेंनी काच वाजवून दार उघडण्यास सांगितले. दार उघडल्यावर "दादा, तुमची रिव्हॉल्वर द्या आणि बाहेर निघा.' असे फर्मान त्यांनी सोडले. "गवारे, अटक करताय मला?' असा सवाल दादांनी केला. यावर "होय! तसे आदेश आहेत', असे म्हणत गवारेंनी सुरेशदादांना अटक केली. 

शहरात गोंधळ 
शहरात सुरेशदादांच्या अटकेचे वृत्त कळताच त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. परिणामी दादांना ताब्यात घेत 10.45 मिनिटांनी एलसीबीचे वाहन महामार्गावर जैन कंपनी बाहेर थांबून राहिले. सर्व समर्थक एमआयडीसी पोलिस ठाण्याबाहेर धरणे देत असताना मध्यरात्रीनंतर पाऊणला गवारेंचे पथक दादांना घेऊन शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस ठाण्यातच वैद्यकीय तपासणी केल्यावर अटकेची लेखी माहिती त्यांना देण्यात आली. नंतर त्यांना संपूर्ण रात्र एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या "लॉकअप'मध्येच काढावी लागली. 

न्यायालयात येण्यास नकार 
दिवस उजाडल्यावर सुरेशदादांनी कोर्टात येण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. पोलिस पथकाने त्यांना उचलून गाडीत टाकले. सुटीचा दिवस असल्याने संपूर्ण न्यायालयाबाहेर कडेकोट बंदोबस्तासह कोणासही आत येण्याची परवानगी नव्हती. दादांना घेऊन पोलिस वाहन न्यायालयात धडकले. मात्र, तरीही दादा न्यायालयात येण्यास तयार नव्हते. 

कोर्टात दिलेली धमकीच नडली 
11 मार्च 2012 रोजी सुरेशदादांना जिल्हा न्यायालयात न्या. दीक्षितांच्या कोर्टात हजर करण्यात आले. न्यायाधीशांपुढे हजर करण्याअगोदरच दादांनी तपासाधिकारी इशू सिंधू यांना "ऐसे सिंधू बहोत आये-गये, तुझे देख लूंगा' अशा शब्दांत धमकावले. न्या. दीक्षित यांना आत हे सर्व ऐकू येत होते. न्यायालयात हजर केल्यावर दादांनी मला बोलायचे आहे, असे सांगितले. न्या. दीक्षितांनी परवानगी दिल्यावर "हा सर्व राजकीय सूड उगवण्याचा प्रकार आहे. सिंधूंनी मला अटक न करण्यासाठी 1 कोटी रुपये मागितले. ते दिले नाहीत, म्हणून त्यांनी अटक केली', असा भरकोर्टातच सुरेशदादांनी आरोप केला. दादांनी सिंधूंना दिलेली धमकी आणि एक कोटींचा आरोप न्यायालयाने रेकॉर्डवर घेतला आणि त्याचाच खटल्यात त्यांना अधिक त्रास झाला. 

पत्रकारांनाही धमक्‍या 
घरकुल प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार आधीपासून न्यायालयात हजर होते. कोणालाही न्यायालय आवारात परवानगी नसताना पोलिसांनी पत्रकारांना कसे येऊ दिले, म्हणून कोर्टावर आलेल्या समर्थकांच्या मोर्चाने गोंधळ घातला. "सकाळ'च्या प्रतिनिधीला जीवे ठार मारण्याची धमकी याच वेळेस देण्यात आली. तत्कालीन डीवायएसपी पंढरीनाथ पवार यांच्या देखत धमकी दिल्याने पत्रकारांना त्यांच्या वाहनातून पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले. तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांनी वृत्तपत्र कार्यालयास एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांचा हत्यारी बंदोबस्त दिला. 

दादा रिलॅक्‍स होऊन बोलू लागले 
घरकुलाच्या तपासाच्या पहिल्या अटकसत्रात प्रदीप रायसोनी, राजा मजूर, नाना वाणी पी. डी. काळे यांना अटक होऊन पोलिस कोठडीनंतर कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. तपासाधिकारी इशू सिंधू यांनी कंत्राटदार, रमेशदादा जैन, खानदेश बिल्डरचे सर्वेसर्वा सुरेशदादा जैन यांना जबाबासाठी स्वतःहून हजर होण्याची नोटीस बजावली. दादांचा जबाब झाला, त्यावेळी सिंधूंनी चौकशीदरम्यान त्यांच्या वयाचा मान राखत केवळ प्रश्‍नोत्तरांच्या स्वरूपात माहिती घेतली. चौकशीदरम्यान त्यांना चहा बिस्किटे दिल्यावर दादा रिलॅक्‍स होऊन बोलू लागले... जबाबाव्यतिरिक्त "तुम्ही मला अटक करणार आहात का?' अशी विचारणाही दादांनी केली होती. मात्र, तेव्हा सिंधूंनी "सध्या तरी मला अटकेची आवश्‍यकता नाही', असे उत्तर देत वेळ टाळून नेली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com