खंडर झालेली घरकुले.. जुगार, पत्ते अवैध धंद्यांचा अड्डा...! 

भूषण श्रीखंडे
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

जळगाव : तत्कालीन पालिकेने सुरू करून अर्धवट पडलेल्या घरकुल योजनेत सम्राट कॉलनी, मासूमवाडीतील घरकुलांचाही समावेश आहे. सम्राट कॉलनीत दोन मजली इमारत अपूर्णच आहे; परंतु या इमारतीत दिवसभर सट्टा, पत्ते, तळिरामांसह आंबटशौकिनांचा धुडगूस सुरू असतो. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून, ना पोलिस प्रशासन याकडे लक्ष देत, ना महापालिकाही...! घरकुल घोटाळ्यात आरोपींना शिक्षा झाल्यानंतर प्रत्यक्षात या घरकुलांची अवस्था काय? याबाबत "सकाळ'च्या पाहणीतून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत... 

जळगाव : तत्कालीन पालिकेने सुरू करून अर्धवट पडलेल्या घरकुल योजनेत सम्राट कॉलनी, मासूमवाडीतील घरकुलांचाही समावेश आहे. सम्राट कॉलनीत दोन मजली इमारत अपूर्णच आहे; परंतु या इमारतीत दिवसभर सट्टा, पत्ते, तळिरामांसह आंबटशौकिनांचा धुडगूस सुरू असतो. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून, ना पोलिस प्रशासन याकडे लक्ष देत, ना महापालिकाही...! घरकुल घोटाळ्यात आरोपींना शिक्षा झाल्यानंतर प्रत्यक्षात या घरकुलांची अवस्था काय? याबाबत "सकाळ'च्या पाहणीतून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत... 

घरकुलांमध्ये अवैध धंदे 
सम्राट कॉलनीमधील दोन मजली दोन इमारतींत घरकुलांचे 75 टक्के काम झाले आहे; परंतु अनेक वर्षांपासून या इमारती पडून आहेत.त्या "खंडर' झाल्या आहेत. या इमारतींमध्ये आजूबाजूच्या परिसरातील टवाळखोरांचा दिवसभर अड्डा भरलेला दिसतो. यात सट्टा, पत्ता सर्रास सुरू असतात. 

मद्यपी, गर्दुल्यांचे झाले ठिकाण 
घरकुलांच्या या सांगाड्यात कासमवाडी, जोशी कॉलनी, कंजरवाडा आदी वस्त्यांतील टवाळखोर मुलांचा हा अड्डा आहे. इमारतीच्या खोल्यांमध्ये मद्यपींचे ठिकाण असून, तेथे पार्ट्या दिवसाढवळ्या सुरू असतात. गर्दुल्यांचाही मोठा त्रास असून, दुपारी व रात्री गर्दुल्यांसह तळिरामांची "शाळा'च तेथे भरलेली असते. 

आंबटशौकिनांचे ठिकाण 
सम्राट कॉलनीमधील उभारलेल्या घरकुलांची इमारत बऱ्यापैकी सुस्थितीत आहे; परंतु या अवस्थेत असलेल्या घरकुलांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्त्यांचे खेळ, जुगार असे अवैध धंदे सुरू असतात. त्यात रात्री आंबटशौकिनांचाही गोतावळा भरलेला असतो. काही महिला, तरुणींना तेथे आणून अश्‍लील प्रकार चालत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी "सकाळ'कडे केल्या. 

महापालिका, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष 
या घरकुलांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत अनेक वेळा पोलिस प्रशासनासह महापालिका प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत; परंतु ना पोलिस प्रशासनाकडून तेथे कारवाई होते, ना महापालिका प्रशासनाकडून. इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात नसल्याचे दिसत आहे. 

परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले 
या घरकुलांमध्ये चोर, गुन्हेगारी प्रवृत्तीचा अड्डा असल्याने मोठ्या प्रमाणात परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जवळच एका गणेश मंडळाची दानपेटी बुधवारी (ता. 4) रात्री चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज उघडकीस आली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या त्रासाला कंटाळले आहेत. 
 
मासूमवाडीसमोरील घरकुलांचा सांगाडा 

सम्राट कॉलनीतील घरकुलाच्या काही अंतरावर मासूमवाडीसमोरील घरकुले ओटे व त्यावर पिलर उभे असलेल्या अवस्थेत आहे. तेथेही मोठ्या प्रमाणात टारगट मुलांचा घोळका कायम असतो. पत्ते खेळणाऱ्यांचाही त्रास कायम असतो. 

"पंतप्रधान आवास'मध्ये समाविष्टसाठी प्रयत्न 
या घरकुलांचे सांगाड्याचे बांधकामाचे सर्वेक्षण करून पंतप्रधान आवास योजनेत समावेश करून घरकुल पूर्ण करण्याचे काम करता येईल का? याबाबत तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी या घरकुलांची पाहणी केली होती. घरकुलांबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला होता. 

अशी आहे आकडेवारी 
- सम्राट कॉलनी, मासूमवाडी ः 900 घरकुलांची योजना 
- दुमजली इमारती संख्या : 2 
- पूर्ण झालेले घरकुल : 0 
- अपूर्ण घरकुले : 900 
- घरकुलांसाठी वापरलेली जागा : 2 हेक्‍टर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gharkul wastav part 3 ground report