आदिशक्‍तीचा शहरात आजपासून जागर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

जळगाव ः चैतन्यदायी नवरात्रोत्सवाला उद्यापासून (ता. 29) प्रारंभ होत आहे. घरोघरी विधिवत घटस्थापना होऊन आदिशक्‍तीची आराधना केली जाणार आहे. शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे व देवीच्या मंदिरांमध्ये या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. घटाचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजार गर्दी झाली असल्याने चैतन्य पसरले होते. 

जळगाव ः चैतन्यदायी नवरात्रोत्सवाला उद्यापासून (ता. 29) प्रारंभ होत आहे. घरोघरी विधिवत घटस्थापना होऊन आदिशक्‍तीची आराधना केली जाणार आहे. शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे व देवीच्या मंदिरांमध्ये या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. घटाचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजार गर्दी झाली असल्याने चैतन्य पसरले होते. 

नवरात्रोत्सवाची तयारी बहुतांश ठिकाणी पूर्ण झाली असून गृहीणींकडून घराची स्वच्छता, रंगकाम, भांड्यांची साफसफाई देखील पूर्ण झाली आहे. उद्या घरोघरी घटस्थापना केली जाणार असल्याने घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे मुख्यबाजारपेठेसह ठिकठिकाणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. आज सकाळपासूनच बाजारात गर्दी होती. 

दुर्गामातेच्या विलोभनीय मूर्त्या 
सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी बाजारपेठेत देवीच्या विविध रूपातील विलोभनीय मूर्ती विक्रीस आल्या आहेत. यामध्ये सप्तशृंगी देवी, माहूरची देवी, कालिकामाता, तुळजापूरची भवानी आदी देवींच्या एक फुटापासून ते दहा फुटापर्यंतच्या मूर्त्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या मुहूर्तावर वाजतगाजत मिरवणूक काढून देवीची स्थापना करण्यात येणार आहे. 

पूजेच्या साहित्याची ठिकठिकाणी दुकाने 
घटस्थापनेसाठी लागणारी मंडपी, कुंकू, हळद, देवीचे वस्त्र आदींना सध्या मागणी वाढली आहे. घट, विड्याची पाने यासह अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी दिवे, काळी माती विक्रीचे दुकाने थाटण्यात आली आहे. 

सुभाष चौकात भवानीमाता यात्रा 
दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या सुभाष चौकातील भवानीमातेची यात्रा भवानीमाता मंदिर ते सुभाष चौक, तसेच सुभाष चौक ते चौबे शाळेपर्यंत असणार आहे. नवत्रोत्सवानिमित्त खेळणी, पूजासाहित्य, श्रृंगाराचे सामान, घरगुती सामान आदींची दुकाने थाटली जाणार आहेत. 

गुजराथी समाजाची 60 वर्षांची परंपरा 
गुजराथी समाज मित्र मंडळातर्फे गेल्या 60 वर्षांपासून नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात जल्लोषात साजरा केला जात असतो. शहरातील खानदेश सेंट्रलच्या प्रांगणात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या अध्यक्षपदी मुकेश चव्हाण, उपाध्यक्षपदी रोनक जानी, हितेश शहा व जयेश मेहता यांची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवासाठी राजकोट येथील नवरंग बीट ग्रुप आर्केस्ट्राचे कलाकार सादरीकरण करणार आहे. 

बंगाली सुवर्णकारागीरांतर्फे दुर्गापूजन 
बंगाली सुवर्णकार मित्र मंडळातर्फे शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात सरभोजनीन दुर्गा पूजन सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी बंगाली सुवर्ण कारागीरांतर्फे या सोहळ्याचे आयोजन येते. जास्तीत जास्त भाविकांनी यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ghatsthapna durgadevi jagar