
मुख्यमंत्र्यापासून तर सर्व मंत्री घाबरलेले असून ते जनतेला काय धीर देणार आणि यातून कसे बाहेर काढणार, हा गंभीर प्रश्न आहे, अशी टीका राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री- भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.
जळगाव : केरळमध्ये पूर आल्यावर राज्याचा मंत्री म्हणून मी स्वत: औषधी घेऊन गेलो. कोल्हापूरच्या पुरात उतरून आपण स्वत: मदत केली. नाशिकच्या पुरातही आपण थेट त्या ठिकाणी जाऊन मदत केली. शासनातर्फे मंत्री म्हणून आम्ही लोकांना धीर दिला. परंतु आज "कोरोना'ची गंभीर परिस्थिती असताना मुख्यमंत्री घरी बसून आहेत, तर मंत्री काय करताहेत हेच कळत नाही. दुसरीकडे जनता मात्र थेट मरणाच्या दारात आहे. मुख्यमंत्र्यापासून तर सर्व मंत्री घाबरलेले असून ते जनतेला काय धीर देणार आणि यातून कसे बाहेर काढणार, हा गंभीर प्रश्न आहे, अशी टीका राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री- भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.
"कोरोना'सारखी गंभीर परिस्थिती असताना राज्यशासन काय करीत आहे, हेच कळत नाही. त्यामुळे जनता आता हवालदिल झाली आहे. राज्यात मृतांच्या आकड्यासह संशयितांची संख्याही वाढत आहे. "कोरोना'रुग्णांनी हॉस्पिटल फुल्ल आहेत. आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशी स्थिती असताना मुख्यमंत्री व इतर मंत्री निर्धास्त आहेत. घरात बसूनच ते नागरिकांना पाणी उकळून प्या, मास्क लावा, काळजी घ्या, असा सल्ला देत आहेत. हे चित्र अतिशय विदारक आहे.
मंत्री अमित देशमुख आहेत कुठे?
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री कोण आहेत, ते कुणालाही माहीत नाही. मंत्री अमित देशमुख आपल्या लातूरच्या घरात बसले आहेत. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत "कोरोना'ची गंभीर स्थिती असताना हे मंत्री महोदय एकाही मेडिकल कॉलेजला साधी भेट देण्यासाठीही गेलेले नाहीत. मी मंत्री असतो तर राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजमध्ये फिरून त्या ठिकाणी पाहणी करून आदेश दिले असते. परंतु या देशमुखांना जनतेची काळजी नाही, त्यांना आपले लातूरचे घरच सोडवत नाही.
"डीन'च्या बदल्यांनी साधणार काय?
राज्यातील प्रशासनात समन्वय नसल्याने "कोरोना'चे रुग्ण वाढतच आहेत. अशा स्थितीत मात्र मेडिकल कॉलेजच्या "डीन'च्या बदल्या केल्या जात आहेत. तब्बल अर्धा डझन "डीन'च्या बदल्या या शासनाने केल्या. यातून त्यांनी नेमके काय साधले हा प्रश्नच आहे. कारण या बदल्या मेडिकल कॉलेजला चांगले काम व्हावे, यासाठी नाहीत तर त्या मेडिकल कॉलेजला त्या "डीन'चे काम चांगले नाही म्हणून त्याची दुसऱ्या मेडिकल कॉलेजला बदली केली. म्हणजे एकूण काय तर अकार्यक्षम अधिकारी दुसऱ्या ठिकाणी पाठविले म्हणजे त्या ठिकाणीही हे अधिकारी रुग्णांची संख्या वाढविणार. त्यामुळे आजचे राज्यातील शासन सैरभर झाले असून त्यांना काहीही सूचत नाही. त्यामुळे जनता वाऱ्यावर आहे