गिरणा अर्बन क्रेडिट सोसायटीची फसवणूक; सहा जणांवर गुन्हा 

गिरणा अर्बन क्रेडिट सोसायटीची फसवणूक; सहा जणांवर गुन्हा 

जळगाव : वेगवेगळ्या नावाने फर्मचे व्यापारी असल्याचे भासवत कर्ज घेऊन त्यांची परतफेड न करता गिरणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 3 लाख 50 हजारांत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने आज रामानंदनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे संशयितांनी कर्ज घेतेवेळी गहाण ठेवलेल्या मिळकतींचीही बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचे समोर आले आहे. 
गिरणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्र असून, पतसंस्था ही ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारून, गरजू लोकांना कर्ज वाटप करण्याचे काम करते. या संस्थेचे किशोर भागवत खडसे (रा. पंचमेश प्लाझा, गिरणा टाकीजवळ, जळगाव) सचिव आहेत. 
रामकृष्ण ओंकार ढाके यांनी केमिकल ट्रेडिंगचे व्यापारी तसेच राहुल उल्हास चौधरी यांनी मयूर ट्रेडर्स कन्सल्टंट्‌स नावाने खत विक्रीचा व्यवसाय असून, त्यावर लीलाधर नरोत्तम राणे याने हे मार्केटिंग मॅनेजर असल्याचे भासवले. यानंतर ढाके यांनी पत्नी ज्योती ढाके हिला संमतीदार तर राहुल चौधरी व लीलाधर राणे यांना जामीनदार म्हणून उभे करून पतसंस्थेकडून व्यवसाय वाढीच्या कारणासाठी 3 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले. 
कर्ज घेतेवेळी रामकृष्ण ढाके यांनी स्वतःच्या नावे असलेली एरंडोल तालुक्‍यातील पिंप्री येथील गट क्रमांक 45 ही शेतजमीन तर पत्नी ज्योती हिच्या नावे असलेली मेहरुणमधील शेत सर्व्हे 236 अ/2 व 237 यापैकी प्लॉट क्रमांक 13 या मिळकती पतसंस्थेजवळ गहाण ठेवल्या. कर्जफेड करत नसल्याने सचिव किशोर खडसे यांनी मिळकती जप्त करण्याची कारवाई केली असता ढाके यांनी बनावट खरेदीखत तयार करून पिंप्री बुद्रूक येथील गहाण शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याचे दिसून आले. 
संशयितांनी कर्ज परत न केल्याने 31 मार्च 2018 अखेर ही रक्कम व्याजासह 18 लाख 28 हजार 724 वर पोचली आहे. रकमेची मागणी केली असता सचिव खडसे यांना ढाके याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार खडसे यांनी ढाके विरोधात रामानंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे. तसेच ढाके हा सराईत गुन्हेगार असून, त्याने अशा अनेक पतसंस्थांची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. 
पोलिसांनी गुन्हा न दाखल केल्याने सचिव किशोर ढाके यांनी न्यायालयात तक्रार दिली होती. न्यायालयाचे आदेशाने फसवणूक प्रकरणी रामकृष्ण ओंकार ढाके (वय 55), ज्योती रामकृष्ण ढाके (वय 48), राहुल उल्हास चौधरी (वय 40, तिघे रा. रामदेव अपार्टमेंट एसएमआयटी महाविद्यालयासमोर, जळगाव), लीलाधर नरोत्तम राणे (वय 55, रा. राधाकिसनवाडी, जळगाव), महेश पुरुषोत्तम सोमाणी (वय 50), प्रदीप पुरुषोत्तम सोमाणी, (वय 48, दोघे रा. पिंप्राळा) यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com