PHOTO सावधान...हा पूल केव्हाही कोसळेल..! 

देविदास वाणी
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गिरणा नदीवरील बांभोरीजवळचा पूल मुंबई-नागपूर आणि गुजरातला महाराष्ट्राशी जोडणारा "सेतू' मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वाहतूक होत असते. मात्र, गिरणा नदीपात्रात बेकायदेशीरपणे भरणाऱ्या वाळूमाफियांच्या जत्रेने पुलाच्या रचनेलाच धक्का देणे सुरू केले आहे. 

जळगाव : जिल्ह्यातील बेसुमार वाळू उपसा व वाहतूक सामान्यांच्या जिवावर उठली आहे. तर दुसरीकडे, दोनशे मीटरपर्यंत उपशाला बंदी असताना गिरणा नदीपात्रात बांभोरी पुलालगतचा दोन्ही बाजूंकडील भाग माफियांनी पूर्ण पोखरून काढला आहे. त्यामुळे पुलाचा आठ मीटरचा पाया उघडा पडला असून, पुलाला मोठा धोका उद्‌भवून तो केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. 

Image may contain: sky, cloud and outdoor

माफियांकडून सर्रास उपसा 
जळगावची गिरणा नदी जशी अनेक गावांना पाणी पुरवठा करते. पावसाळ्यातील पावसामुळे नदीपात्रात प्रचंड वाळूसाठा तयार होतो. गिरणेची वाळूला जळगाव जिल्ह्यासह नाशिक, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यात मोठी मागणी आहे. सोन्याच्या दरात ही वाळू विकली जाते. गेल्या चार, पाच वर्षांपासून वाळूमाफियांनी गिरणा नदीतील ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक ब्रास वाळूचा उपसा सुरू केला आहे. ठेका सुरू असेल वा बंद असेल, केव्हाही गिरणा नदीपात्रात वाळू काढण्यासाठी रात्रंदिवस डंपर, ट्रॅक्‍टर चालक उतरलेले असतातच. 

नक्‍की पहा > पक्षांतर्गत विरोधकांवर होणार कारवाई : खडसे

कठड्याच्या बाजूने 8 मीटरची खोली 
गिरणा नदीचा पूल दहा मोठ्या पिलरवर उभारला आहे. पुलाला अनेक वर्षे झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला. पुलाची अवस्था नुकत्याच झालेल्या पावसाने बिकट झाली आहे. पुलावर रस्ता काहीसा खराब तर काहीसा चांगला आहे. पुलाचे आठ पिलरच्या दोन्ही बाजूंनी सुमारे आठ मीटर खोलपर्यंत वाळू पोखरल्याने पिलर उघडे पडले आहेत. पिलर उघडे पडल्याने रोज त्यातील काही अंश ढासळत आहे. यामुळे पूल केव्हाही कोसळण्याचा धोका आहे. 

Image may contain: bridge, sky, outdoor, nature and water

वाळू उपशाचा असा आहे नियम 
नदीपात्रात पुलाच्या दोन्ही बाजूने दोनशे मीटरपर्यंत वाळू उपसा करता येत नाही. शिवाय, पात्रात अन्य कोठेही वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी, पोकलॅन्ड, क्रेन या यंत्रांचा वापर करण्यासही बंदी आहे. असे असताना गिरणाच नव्हे तर जिल्ह्यातील अन्य नदीपात्रांतही ही यंत्रणा लावून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. 

Image may contain: sky, plant, tree, bridge, cloud, outdoor and nature

महसूल, बांधकाम विभागाला पत्र 
वाळू उपशाने बिकट झालेल्या बांभोरी पुलाच्या स्थितीबाबत महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) जिल्हाधिकाऱ्यांसह, महसूलचे विभागीय आयुक्त, सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले आहे. वाळू उपशाने पूल धोकादायक बनल्याचे या पत्रात म्हटले असून, तातडीने उपाययोजना करण्यासंबंधी विनंती केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon girna river brige vadu upsa