...अन "त्यांचा' गुढीपाडवा झाला गोड! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या घरी जाऊन त्यांना मार्चचा पगार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

जळगाव  : "कोरोना व्हायरस'ने जगभरात हाहाकार माजला. देशातही "शटडाऊन'सह विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. अशा वेळी मदतीचा हात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे वेतन कापू नये, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सुमिरा परिवाराने त्यांच्या विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार आगाऊ देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा गुढीपाडवी गोड होणार आहे. 

सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. आजार होऊ नये, यासाठी घरातच राहण्याच्या सूचना देत राज्य शासनाने खबरदारी घेण्यास सांगितले आहे. अशात मात्र रोजंदारीवर आणि खासगी व्यापाऱ्यांकडे असणारे कर्मचारी यांना ऐन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तसेच गुढीपाडवा सणासाठी आर्थिक चणचण भासत आहे. जीवनावश्‍यक वस्तू घेण्यासाठी अनेकांकडे पैसे नाहीत. ही स्थिती लक्षात घेऊन नवीपेठेतील सुमिरा परिवारातील संजय, अजय, रिकेश तसेच पियुष, आयुष गांधी यांनी त्यांच्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या घरी जाऊन त्यांना मार्चचा पगार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यात ज्येष्ठ कर्मचारी हरिभाऊ खोडपे यांच्यासह अमृत शिंदे, उमेश कोळी, पंकज राठोड, प्रवीण कुंभार, श्रावण अडाऊ, दीपक, सुनील आदींनी मालकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रिकेश गांधी, आयुष, पियुष गांधी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon giving full salary advance to employees Merchant