सोन्याच्या दरात चढ-उतार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर किमतीत होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवडाभरात सोन्याचे दर वाढून 32 हजार 600 रुपयांवर आले तर चांदीचे दर मात्र गेल्या काही दिवसांपासून 38 हजारांवर स्थिरावलेले आहेत. 

जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर किमतीत होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवडाभरात सोन्याचे दर वाढून 32 हजार 600 रुपयांवर आले तर चांदीचे दर मात्र गेल्या काही दिवसांपासून 38 हजारांवर स्थिरावलेले आहेत. 
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे भाव वधारल्याने महिनाभरापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे जळगावमधील सराफ बाजारात पंधरा दिवसांपूर्वी सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 32 हजार 800 रुपयांपर्यंत पोहचले होते. हीच परिस्थिती गेल्या आठवडाभरापासून पाहण्यास मिळत असून, सराफ बाजारात गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होऊन 100- 200 रुपयांनी कमी- अधिक होत आहेत. लग्नसराई असल्याने सोने, चांदी खरेदी वाढल्याने देखील सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील डॉलरच्या किमतीतील बदलाचे मुख्य कारण आहे. 

आठवड्यात चारशे रुपयांनी वाढ 
सुवर्णनगरी समजल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर गेल्या आठवड्यात अस्थिर राहिले आहेत. या अस्थिरतेमुळे 32 हजार 200 रुपयांवर गेलेल्या सोन्याच्या दरात चारशे रुपयांची वाढ झाली आहे. आज (ता.2) सराफ बाजारात दहा ग्रॅमला सोन्याचे दर 32 हजार 600 रुपयांवर पोहचले आहेत. तर चांदीचे दर मात्र, आठवडाभरापासून 38 हजारांवर स्थिरावलेले आहेत. 

गुरुवारी गुरुपुष्यामृत योग 
सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी तसा मुहूर्त पाहिला जात नाही. अनेकजण गुंतवणूक म्हणून खरेदी करत असतात. मात्र, साडेतीन मुहूर्तांवर सराफ बाजारात गर्दी अधिक प्रमाणात होत असते. याशिवाय गुरूपुष्पामृताचा योग असला म्हणजे या दिवशी सोने खरेदीला अधिक महत्त्व मानले जाते. यामुळे हा योग साधण्यासाठी एक ग्रॅम का होईना सोने खरेदी केली जात असते. यंदाचा पहिला गुरुपुष्यामृत योग गुरुवारी (ता.6) आहे. यामुळे गुरुवारी मुहूर्त साधण्यासाठी सराफ बाजारात खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gold rate up down