बाजार समित्यांत धान्याचे व्यवहार सुरू : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 एप्रिल 2020

बाजार समित्या बंद असल्याने तो माल शेतकऱ्यांना एकतर कमी भावात विकावा लागतो किंवा घरी परत आणावा लागतो. शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी वरील बाजार समित्या फक्‍त धान्य खरेदीचे व्यवहार ठेवण्याचे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जळगाव :  जळगाव, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यात धान्याचे व्यवहार लॉकडाउनच्या काळात सुरू ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत. 

देशभरात कोरोना'संसर्ग होऊ नये यासाठी सोशल डिस्टींग ठेवून बाजार समित्यांचे व्यवहार ठेवण्यास सांगण्यात आले होते. मात्र वारंवार सूचना देवूनही सोशल डिस्टन्सींग पाळली जात नसल्याने गेल्या आठवड्यात वरील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंदचे आदेश दिले होते. मात्र सध्या अनेक शेतकऱ्यांचा माल काढून तयार आहे. मात्र बाजार समित्या बंद असल्याने तो माल शेतकऱ्यांना एकतर कमी भावात विकावा लागतो किंवा घरी परत आणावा लागतो. शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी वरील बाजार समित्या फक्‍त धान्य खरेदीचे व्यवहार ठेवण्याचे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

धान्य बाजारांचे व्यवहार सुरू ठेवताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचना, आदेश, निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ न देता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) पाळावे. त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांवर देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील. 

भाजीपाला मार्केटमधील व्यवहार बंद 
जळगाव, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाला मार्केटचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Grain transaction started in market committees: Dr. Dhakne, Collector order