उद्दिष्ट साडेसहा लाख; खरेदी 20 हजार क्विंटल..मका खरेदी अशक्‍य; ज्वारीही पडून !

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

जिल्ह्यात मकापेक्षा ज्वारीचे उत्पादन अधिक होत असते. पण ज्वारी खरेदीस दुसऱ्या टप्प्यात परवानगी मिळालेली नाही. ती मिळावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी आहे.

कापडणे  : जिल्ह्यात पणन महासंघाच्या चारही केंद्रांवर मक्‍याची संथ गतीने खरेदी सुरू आहे. यात 15 जुलैपर्यंत साडेसहा लाख क्विंटल खरेदीला मंजुरी मिळाली आहे. आतापर्यंत केवळ 20 हजार क्विंटल मक्‍याची खरेदी झाली आहे. दहा दिवसांत ही खरेदी पूर्ण होणे शक्‍य नसल्याने प्रक्रियेला "ब्रेक' लागण्याची शक्‍यता असेल. मात्र, पालकमंत्र्यांनी शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली आहे. 

प्रतिक्विंटल मक्‍याचा दर एक हजार 760, तर ज्वारीसाठी दोन हजार 550 रुपये दर आहे. धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुक्‍यांत मका खरेदी केंद्र आहे. पूर्वी अडीच लाख क्विंटल खरेदीला परवानगी होती. ती पूर्ण झाल्यानंतर खरेदी केंद्र बंद पडले. शेतकऱ्यांची मागणी आणि लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे पुन्हा मका खरेदीस मान्यता मिळाली. त्यात नव्याने साडेसहा लाख क्विंटल खरेदीला परवानगी मिळाली. चार ते पाच दिवसांच्या खरेदीनंतर बारदान संपले. ते उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे आता पुन्हा खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत केवळ वीस हजार क्विंटल मक्‍याची खरेदी झाली आहे. सरासरी दोन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. येत्या दहा दिवसांत खरेदी होणे शक्‍य नाही. पुन्हा वाढीव मुदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होऊ लागली आहे. 

ज्वारीची खरेदी बंदच 
जिल्ह्यात मकापेक्षा ज्वारीचे उत्पादन अधिक होत असते. पण ज्वारी खरेदीस दुसऱ्या टप्प्यात परवानगी मिळालेली नाही. ती मिळावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी ज्वारी खरेदीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला नाही. परिणामी शेतकऱ्यांकडे ज्वारी पडून आहे. 

व्यापारीच मालामाल 
पणनचे खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर शेतकरी उतारे काढतात. त्यांना तलाठी सापडत नाही. तोपर्यंत बरेचसे व्यापारी 40 ते 50 उतारे जमा करून जातात. त्यांच्याकडील खरेदी लवकर सुरू होऊन जाते. शेतकऱ्यांचा क्रमांक उशिरा लागतो. किंबहुना बरेच शेतकरी वंचित राहतात. त्यांना न्याय दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon grains target is six and a half million Purchase 20 thousand quintals