नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंवर मतदारांचा विश्‍वास : गुलाबराव पाटील

कैलास शिंदे
सोमवार, 3 जून 2019

जळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. शिवाय आम्ही रस्त्यांसह केलेली अन्य विकासकामे यामुळे लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधील जनतेने युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना लीड दिला आहे. विधानसभेतही जनतेचा हाच विश्‍वास कायम राहणार असल्याबाबत आमच्या मनात काहीही शंका नाही, असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. 

जळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. शिवाय आम्ही रस्त्यांसह केलेली अन्य विकासकामे यामुळे लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधील जनतेने युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना लीड दिला आहे. विधानसभेतही जनतेचा हाच विश्‍वास कायम राहणार असल्याबाबत आमच्या मनात काहीही शंका नाही, असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत "सकाळ'शी बोलताना राज्यमंत्री पाटील म्हणाले, की जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीतर्फे गुलाबराव देवकर उमेदवार होते. ते याच जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते आणि मंत्रीही झाले होते. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात लीड मिळेल, असा दावा केला जात होता. मात्र, या मतदारसंघात आपण केलेली रस्त्यांची कामे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा असलेला विश्‍वास यामुळे जनता "युती'च्या उमेदवारालाच अधिक मतदान करेल, असा मला विश्‍वास होता. आमचा विश्‍वास जनतेने सार्थही ठरविला. म्हणूनच जळगाव ग्रामीणमधून तब्बल 64 हजार 718 मतांचा लीड "युती'च्या उमेदवाराला दिला आहे. 

धरणगाव तालुक्‍यातही आघाडी 
श्री. पाटील म्हणाले, की जळगाव तालुक्‍यातून 36 हजार 574, तर धरणगाव तालुक्‍यातून 27 हजार 786 मताची आघाडी उन्मेष पाटील यांना मिळाली. मतदारसंघात 176 गावे, एक पालिका, आठ जिल्हा परिषद गट, 16 पंचायत समिती गण आणि 143 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत 176 गावांपैकी 155 गावांत युतीच्या उमेदवाराला मताधिक्‍य आहे. धरणगाव शहरातून 5036 मताधिक्‍य मिळाले आहे. जिल्हा परिषद गटांतही युतीच्या उमेदवारालाच आघाडी मिळाली आहे. 

विकासकामेच बोलली 
जळगाव ग्रामीण मतदारसंघात गेल्या पाच वर्षात आपण विकासकामांसाठी सतत पाठपुरावा केला. केवळ काम...काम.. आणि कामच आपण केले. मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते केले आहेत. शेतरस्त्यांची कामेही केलेली आहेत. आता कालावधी कमी असला, तरी उर्वरित गावाच्या कामांसाठी आपण निधी मंजूर केला आहे. त्या कामांचे भूमिपूजनही आपण लवकरच करणार आहोत. शेळगाव बॅरेज, गिरणा नदीवरील बलून बंधारे, पाडळसरे प्रकल्पासाठीही आपला जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. आपण केलेल्या कामामुळे जनता आपल्या पाठीशी आहे, असेही राज्यमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. 

विधानसभेतही यश मिळणारच 
लोकसभेत युतीच्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीतही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्‍वास व्यक्त करेल. तसेच आपण मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या बळावर जळगाव ग्रामीणमधून मोठ्या मताधिक्‍याने युतीला कौल मिळेल, आपल्याला विश्‍वास असल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. 
 

जळगाव ग्रामीण मतदान 
1,21,742 मते 
उन्मेष पाटील (भाजप) 

57,024 मते 
गुलाबराव देवकर 
(राष्ट्रवादी) 

64 हजार 718 
मताधिक्‍य 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gramin gulabrao patil