सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

धरणगाव ः जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चांदसर परिसरात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रांताधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी केली. जळगाव व धरणगाव दोन्ही तालुक्‍यात सुमारे 68 हजार हेक्‍टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. 

धरणगाव ः जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चांदसर परिसरात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रांताधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी केली. जळगाव व धरणगाव दोन्ही तालुक्‍यात सुमारे 68 हजार हेक्‍टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. 
विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार दोन्ही तालुक्‍यांत युद्ध पातळीवर संबंधित यंत्रणेमार्फत पंचनामे सुरू आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रसंगी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने खूप मोठे अस्मानी संकट उभे राहिले आहे. कपाशी, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका पिकांना कोंब फुटले असून, मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून पाणी साचल्याने कपाशी पीकही सडत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हे संकट बळीराजापुढे उभे ठाकले आहे. झालेला खर्चही निघणार नाही इतके नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या भयावह परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व इतर यंत्रणांसमवेत धरणगाव तालुक्‍यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी सवांद साधून पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ विमा क्‍लेम मिळावे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना व विमा कंपनी प्रतिनिधींना सूचना केली. जिल्हाधिकारींनी देखील संबंधित प्रशासनाला याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळेल अशी खात्रीही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. 
जळगाव तालुक्‍यात 45 हजार 302 पैकी 42 हजार 345 हेक्‍टर तसेच धरणगाव तालुक्‍यातील 37 हजार 915 पैकी 25 हजार 760 हेक्‍टर असे जळगाव ग्रामीण मतदारसंघात 68 हजार 105 हेक्‍टर क्षेत्रात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी जिरायत व बागायत व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरळ मुंबईहून मतदारसंघात येऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले. सावदा शिवार, खेडी- कढोली शिवार, पोखरी तांडा शिवार, चांदसर शिवार, दोनगाव, पथराड, टाकळी या शेत शिवारात अधिकाऱ्यांसमवेत मंत्री पाटील यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच चंदू माळी, आबा माळी, सतीश पाटील, आप्पा धनगर, असलम शेख, राहुल शिरोळे, प्रकाश कोळी, शुभम पाटील, दिगंबर माळी, अजित शेख, बाळू पाटील यांच्यासह महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gramin gulabrao patil farmer pik nukasn