राज्यमंत्र्यांसमोर तगडा उमेदवार कोण? 

राज्यमंत्र्यांसमोर तगडा उमेदवार कोण? 

जळगाव ग्रामीणमध्ये सत्ताधारी आणि विरोधी उमेदवार ठरलेला, दोन्ही उमेदवारांत तिसऱ्यांदा तगडी फाईट होण्याची शक्‍यताही होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना घरकुल खटल्यास शिक्षा झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना निवडणुकीच्या आखाड्यात काहीसे निश्‍चिंतीचे चित्र दिसत आहे. मात्र, त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आव्हान आहे. आता देवकरांचे पुत्र विशाल देवकर यांचे नाव पुढे येत आहे. जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार हेही दावेदार मानले जात आहेत. शिवाय धरणगावचे ज्ञानेश्‍वर महाजन कडवे आव्हान देवू शकतात, असेही सांगितले जाते. 

शिवसेनेचे उपनेते व विद्यमान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ. या मतदारसंघात शिवसेना अगदी तळागाळापर्यंत पाटील यांनी पोहोचविली आहे. मात्र, एक वेळ याच मतदारसंघात त्यांचाही पराभव झाला आहे. हाच पराभव लक्षात ठेवून पाटील यांनी मंत्री झाल्यानंतरही मतदारसंघात संपर्क कायम ठेवत आपले पाय जमिनीवरच असल्याचे दाखवून दिले. रस्ते तसेच इतर विकासकामांचे भूमीपूजन, उद्‌घाटन तसेच काम पूर्ण करण्याचाही त्यांनी धडका लावला आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघाची बांधणी मजबूत करून विरोधकांसमोर आव्हान उभे केले आहे. 

शिवसेनेला टक्कर देण्याची ताकद या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना याच मतदारसंघातील जनतेने मोठ्या मताधिक्‍याने विजयी केले होते. त्यामुळे त्यांना पहिल्याच प्रयत्नात मंत्रिपदही मिळाले होते. मंत्रिपदाच्या काळात देवकर यांनी मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करण्याकडे लक्ष दिले होते. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत पुन्हा यश मिळेल असा विश्‍वास होता. मात्र "घरकुल'प्रकरणात त्यांना अटक झाली, पक्षाने त्यांना कारागृहात असतानाही उमेदवारी दिली. परंतु त्यांचा पराभव झाला. 

सन 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठीही देवकर यांनी तयारी केली होती. पक्षातर्फे त्यांना हमखास उमेदवारी मिळणार, हे निश्‍चित होते. मात्र, "घरकुल'प्रकरणात त्यांना शिक्षा झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आता ताकदीचा उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान आहे. गुलाबराव देवकर यांचे पुत्र विशाल देवकर यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार हे सुद्धा या मतदारसंघातून दावेदार आहेत. त्यांचे वडील (कै.) मु. ग. पवार हे आमदार होते. याच मतदारसंघातील चांदसर हे त्यांचे गाव आहे. त्यांनी या भागातील विकासाकडे लक्ष दिले आहे. धरणगाव तालुक्‍यातील वि.का, सोसायट्यांशी त्यांचा संपर्क आहे. अशा जनसंपर्काच्या आधारावर त्यांचा दावा सक्षम मानला जात आहे. 

धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन यांचाही पक्षाकडे दावा आहे. मतदारसंघातील जातीय गणिताच्या आधारावर त्यांच्या यशाचे गणित मांडले जात आहे; तर युवा कार्यकर्त्या कल्पिता पाटीलही उमेदवारीवर दावा करीत आहेत. आघाडी झाली नाही, तर कॉंग्रेसतर्फे धरणगावचे डी. जी. पाटील यांचा दावा आहे. युती झाली नाही, तर भाजपतर्फे चंद्रशेखर अत्तरदे, पी. सी. पाटील यांचीही उमेदवारी होऊ शकते. या शिवाय वंचित बहुजन आघाडीतर्फे या मतदारसंघात ऐनवेळी उमेदवार दिला जाऊ शकतो. मात्र, सध्या तरी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर "राष्ट्रवादी'चा तगडा उमेदवार कोण, याकडेच अधिक लक्ष आहे. 
 
विधानसभा 2009 मते 
गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) ः 71,556 
गुलाबराव पाटील ः (शिवसेना) ः 66,994 
ललित कोल्हे (मनसे) ः 13,570 
 

विधानसभा 2014 
गुलाबराव पाटील (शिवसेना) ः 84020 
गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) 52,653 
पी. सी. पाटील (भाजप) 44011 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com