ग्रामविकास निधी कर्जाचे 18 कोटी थकले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

जळगाव ः ग्रामविकास निधीतून पाच टक्‍के व्याजदराने कर्ज घेऊन ग्रामपंचायतींनी गावात कामे करून घेतली. मात्र, या कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ करीत असून, आजपर्यंत ग्रामपंचायतींनी कर्जाची 18 कोटी 9 लाख 72 हजार 712 रुपये इतकी रक्‍कम थकविली आहे. विशेष म्हणजे अनेक ग्रामपंचायतीकडे गेल्या दहा- बारा वर्षांपासून रक्‍कम थकविली आहे. 

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत ग्रामपंचायतींना त्यांची आर्थिक क्षमता पाहून जिल्हा ग्रामविकास निधीतून पाच टक्‍के व्याजदराने दहा वर्षांसाठी कर्ज दिले जाते. मुद्दल आणि व्याज मिळून वर्षातून एकदा परतफेड करावयाची असते. पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार हे कर्ज देण्यात येते. ग्रामपंचायतींनी कर्ज घेऊन गावात कामे केली; मात्र कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्याचे नाव घेतले नाही. 

वसुली केवळ पावणेचार कोटी 
ग्रामपंचायत विभागाकडून पाच टक्‍के व्याजदराने ग्रामपंचायतींना कर्ज देण्यात आले आहे. यात 1988 ते 2005 या कालावधीत कर्ज घेतलेल्या 51 ग्रामपंचायतींकडे साधारण 1 कोटी 69 लाखाचे कर्ज थकीत आहे. यानंतर दिलेल्या कर्ज वाटप झालेल्या 232 ग्रामपंचायतींना 21 कोटी 93 लाख 52 हजार 175 कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये मार्च 2018 पर्यंत मुदत कर्जाची थकबाकी ही 15 कोटी 44 लाख 95 हजार 686 रुपये आणि त्यावरील व्याजाची रक्‍कम 2 कोटी 64 लाख 27 हजार 26 रुपये झाले आहे. 

कर्ज वाटपात अडचणी 
पाच टक्‍के व्याजदराने कर्ज वाटप करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींनी हप्ते थकविल्यामुळे इतर गरजू ग्रामपंचायतींना ग्रामविकास निधीतून अडचणी येऊ शकतात. याशिवाय जर सध्या कर्ज घेतलेल्या ग्रामपंचायतींनी लवकर कर्जाची परतफेड केली नाही; तर त्या ग्रामपंचायतींना देखील यापुढे ग्रामविकास निधीतून कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

Web Title: marathi news jalgaon gramvikas loan pending