प्रत्येक गावात दिला विकास निधी : खासदार रक्षा खडसे

प्रत्येक गावात दिला विकास निधी : खासदार रक्षा खडसे

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावात विविध योजनांच्या माध्यमातून तसेच स्थानिक विकास निधीतून कमी- अधिक प्रमाणात विकासाला निधी उपलब्ध करून दिला आहे, असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघात गटनिहाय मेळावे सुरू केले असून, त्याअंतर्गत तीन तालुके पूर्ण झाल्याचेही त्या म्हणाल्या. 

खासदार खडसे यांनी आज दुपारी "सकाळ'च्या औद्योगिक वसाहतीतील कार्यालयास सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी त्यांनी गेल्या साडेचार वर्षांतील कामांची उपलब्धी आणि निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या तयारीसंदर्भात चर्चा केली. 

रावेर मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात सुमारे 1400 गावे आहेत. खासदार निधी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, नाथाभाऊ पालकमंत्री असताना त्यावेळी विशेष निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात काही ना काही स्वरूपात निधी दिला आहे. गावांच्या लोकसंख्येनुसार हा निधी कमी-अधिक असू शकेल, मात्र प्रत्येक गावाला, भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे श्रीमती खडसे म्हणाल्या. 

रस्ते विकासाला प्राधान्य 
नितीन गडकरींनी संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे तयार करण्याचे स्वप्न पाहिले असून, त्याअंतर्गत आपल्याही मतदारसंघात रस्तेविकासाला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मतदारसंघात येणाऱ्या तरसोद ते चिखलीदरम्यानच्या चौपदरीकरणास वेग आला आहे. बोदवड- मुक्ताईनगर रस्ता पूर्ण झाला असून, मुक्ताईनगर- बऱ्हाणपूर रस्त्याचे कामही मार्गी लागले आहे. मुक्ताईनगर- बोदवड- जामनेर- औरंगाबाद या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. 

बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वरलाही चालना 
बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर हा राज्य महामार्ग प्रकारात वर्ग झाला असून, त्याचा डीपीआर तयार आहे. चौपदरीकरणासाठी भूसंपादन व त्यासंबंधी सर्वेक्षण सुरू आहे. बरीच गावे व शहरांमधून हा मार्ग जात असल्याने सध्याच्या मार्गाच्या बाजूने दोनशे ते पाचशे मीटर अंतरावर हा चौपदरी मार्ग असेल व सध्याचा मार्ग अन्य वाहतुकीसाठी राखीव असेल. लवकरच या मार्गाचे भूसंपादन करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

"मेगारिचार्ज'ला चालना 
तापीवरील महाकाय जलपुनर्भरण योजना महत्त्वाकांक्षी व मोठी असून, त्या योजनेच्या कामासही चालना मिळाली आहे. नुकताच या योजनेसाठी रडार सर्व्हे करण्यात आला. या शिवाय मतदारसंघातील अन्य सिंचनाच्या प्रकल्पांसाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन याकामी सकारात्मक असून, ते जातीने कामांमध्ये लक्ष घालत आहेत. रावेर लोकसभा क्षेत्रात बीएसएनएलअंतर्गत 60 टॉवर नव्याने उभारण्यात आल्याचे श्रीमती खडसे म्हणाल्या. 
 
"लोकसभे'ची तयारी वेगात 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात विचारले असता श्रीमती खडसे म्हणाल्या, की पक्षादेशानुसार आम्ही मतदारसंघात जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे, बैठका घेत आहोत. मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, यावल तालुके पूर्ण झालेत. आता चोपडा, जामनेर, मलकापूर, भुसावळ तालुक्‍यांमध्ये बैठका होतील. 42 गटांपैकी 16 गटांमधील बैठका पूर्ण झाल्या आहेत. बुथप्रमुखही नेमले असून मतदारयादीतील पानप्रमुख नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्या तरी सज्ज आहोत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com