ग्राउंड रिपोर्टः शेत शिवार झाले उजाळ 

live photo
live photo

भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम नसल्याने कधी नव्हे त्यांचे स्थंलातरीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदा एवढी भयावह परिस्थिती तालुक्यात निर्माण झाल्याने १९७२ सालीचा दुष्काळ अनुभवायला येत असल्याचे वृद्ध सांगतात. 
भडगाव तालुका जिल्ह्यातील सधन तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या चार वर्षांपासून तालुक्याला कोणाची दृष्ट नजर लागली की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाहुणा म्हणून आलेला दुष्काळ घरजावयासारखा घर सोडायला तयार नसल्याने बळीराजा चांगलाच मेटाकुटीला आलेला आहे. खरीप हंगाम कसा पेरायचा? असा प्रश्न अल्प भूधारक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 

विहिरींनी गाठला तळ 
तालुक्यात ४२ हजार लागवडीयुक्त क्षेत्र आहे. त्यात २५ हजार क्षेत्र बागायती आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. पर्यायाने बागायती क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. यंदा अवघ्या तीन हजार हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी झाली. त्यातही अनेकांनी पेरणी करून एकप्रकारे सट्टा खेळला. रब्बीत हिरवाईने बहरणाऱ्या शेतात कामात रममाण असणाऱ्या शेतकऱ्यांना ढेकळांची राखण करावी लागत आहे. वडजी (ता. भडगाव) येथील वसंत पाटील यांच्या शेतातील सामूहिक मालकीची विहीर गेल्या पन्नास वर्षांत कधी आटल्याचे त्यांच्या लक्षात नाही. यंदाच्या दुष्काळात मात्र विहिरीत दाणे भरण्यासाखी परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती गिरणा काठावरील विहिरींची आहे. जानेवारीपासूनच विहिरींनी तळ गाठला आहे. पेट्रोल उडावे त्यासारखे विहिरीतून पाणी कमी कमी होत आहे. यामुळे ऊस, केळीचे क्षेत्र नावाला उरले आहे. तर पूर्वहंगामी कापसाची लागवडीलाही आळा बसणार आहे. अनेकांना पाण्याअभावी उभ्या केळीच्या बागा सोडून द्याव्या लागत आहे. गुढे परिसरात लिंबूंच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत एव्हरेस्ट शिखर चढण्यापेक्षा कमी नाही. 

पाण्याची पळवापळवी 
सध्या जमिनीच्या जल पातळीत कमालीची घट झाली आहे. जो तो विहिरी खोल करीत आहे. आडवे बोअरिंग करण्याला प्राधान्य देत आहेत. तर गिरणा काठावरचे शेतकरी पात्रात शेवड्या खोदून पाण्याची पळवापळवी करीत आहेत. पाण्यासाठी जमिनीला पडणाऱ्या शिद्र्यांमुळे ती देखील विव्हळत असेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी पहिल्यांदा ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीतील पाण्याच्या पळवापळवीमुळेच गिरणेच्या 


आवर्तनाचे पाणी जेमतेम पंधरा दिवस पुरते. 

चाऱ्याचा प्रश्न गंभीर 
तालुक्यात २९ हजार ३९१ गायी, बैलांची संख्या आहे. तर १५ हजार ६३२ म्हशी आहेत. १४ हजाराच्या जवळपास शेळ्या, मेंढ्याची संख्या आहे. या सर्वांना पोसणे पशुपालकांसमोर अवघड समस्या झाली आहे. चाऱ्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. ज्वारीचा चारा हजार रुपये शेकडा दराने विक्री होत आहे. ज्या मक्याच्या चाऱ्याला शेतकरी अक्षरशः जाळून टाकात होते, तो चाराही यंदा भाव खात आहे. अडीच हजार रुपये टनाने उसाचा चारा विक्री होत आहे. त्यात पाझर तलावांमध्ये ठणठणाट आहे. विहिरी आटल्याने जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तितकाच गंभीर बनला आहे. नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी येणारे मेंढपाळांना आपल्या मेढ्यांना चारा आणि पाणी उपलब्ध करताना नाकीनऊ येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विकली असून तर बऱ्याच जणांनी चारा उपलब्ध असलेल्या आपल्या नातेवाइकांकडे गुरे पाठवलेली दिसत आहेत. 

मजुरांच्या हातांना काम नाही 
तालुक्यात रब्बीचा हंगाम गेल्याने मजुरांच्या हातांना काम नाही. दिवसभर काम केले तर सायंकाळी हातातोंडापर्यंत घास जाईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकांनी कामासाठी इतरत्र स्थलांतर करणे पसंत केले आहे. त्यामुळे तालुक्यातील काही तांडे अक्षरशः ओस पडले आहेत. बहुतांश तरुणांनी सुरत, मुंबई, पुणे, नाशिकला बस्तान हलविले आहे. 

भडगाव तालुक्यात पाणीबाणी 
तालुक्यात अभूतपूर्व पाणी आणीबाणी निर्माण झाली आहे. पिंपरखेड सारख्या गावात दोन टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय तीन गावात टॅंकरने पाणी पोचवले जात आहे. तर सहा गावांना खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. गिरणा काठावरील गावांची धरणातून आवर्तन सुटल्यानंतर पंधरा दिवस पाणीटंचाई दूर होते. त्यानंतर मात्र पुन्हा टंचाईला सामोरे जावे लागते. कजगावसारख्या मोठ्या गावात मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदा गिरणा धरणातून दर दोन महिन्यांनी आवर्तन सुटत असल्याने तेवढी एक समाधानाची बाब आहे. 

निवडणुकीत हरवला दुष्काळ 
सुमारे महिन्यापासून तालुक्यात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत होता. त्यामुळे राजकीय नेत्यांसह प्रशासनाने दुष्काळाकडे सपशेल पाठ फिरवली होती. शासनाने निवडणुकीपूर्वी दुष्काळी अनुदान जाहीर केले. ते अनुदान बॅंकेच्या खात्यांतून शेतकरी घेत आहेत. त्यामुळे किमान अनेकांच्या घरी चूल पेटत आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळासाठी करावयाच्या उपाययोजना पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाहीत. रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू व्हायला हवी. मात्र, तेवढी गती दिसत नाही. इतरही उपाययोजना निवडणुकीमुळे थांबल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com