ग्राउंड रिपोर्ट : कोरड्या नदीपात्रातून पाणी मिळविण्यासाठी धडपड 

live photo
live photo

अमळनेर ः बोरी नदीकाठावरील कोळपिंप्रीसह अंबापिंप्री, कन्‍हेरे- फापोरे परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी ग्रामस्‍थांना सुमारे पाच किलोमीटरपर्यंत नदीपात्रात येऊन पाणी भरावे लागत आहे. या गावांमध्ये विकतचे पाणी घेऊन तहान भागवली जात असून, कोळपिंप्री ते कन्‍हेरे दरम्‍यान बोरी नदीपात्रात एका झीरवर पाणी भरण्यासाठी रांगा लागत आहेत. 
पूर्वीच्‍या काळी बोरी नदीत बारमाही पाणी असल्‍याने पाणीटंचाईचा प्रश्‍नच नव्‍हता. मात्र, काळाच्‍या ओघात बारमाही नदी पावसाळ्यात चारमाहीवर आली. त्‍यानंतर गेल्‍या अनेक वर्षांपासून सतत दुष्काळ असल्‍यामुळे भूजलपातळी खालावली. त्‍यातच गेल्‍या चार ते पाच वर्षापासून बोरी नदी दुथडी भरुन वाहिलेलीच नाही. परिणामी नदीकाठावरील गावे तहानलेलीच आहेत. उन्हाळ्यात सुरू होणारी पाणीटंचाई गेल्या दोन ते तीन वर्षापासून हिवाळ्यातच जाणवू लागली आहे. या चारही गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्याठाक पडल्याने नळाला पाणी येणेच बंद झाले आहे. परिणामी पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागते. शेतातील काही खासगी विहिरी तसेच कूपनलिका आधार ठरत आहेत. 

कोळपिंप्रीत पाच दिवसाआड पाणी 
कोळपिंप्री (ता. पारोळा) येथे भीषण पाणीटंचाई असून, सिंधूबाई पाटील यांची कूपनलिका अधिग्रहीत करण्यात आली आहे. लोकसहभागातून तयार केलेल्या कूपनलिकेचे पाणी विहिरीत सोडून ग्रामस्थांना वापरण्यासाठी उपयोगी पडत आहे. चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पिण्याचे पाणी मात्र, विकतचे घ्यावे लागत आहे. 

अंबापिंप्रीत तीव्र पाणीटंचाई 
अंबापिंप्री (ता. पारोळा) येथेही हिवाळ्यापासूनच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. एकाची विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे. आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी खासगी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच अनेक ग्रामस्थ पाचशे ते सातशे रूपये देऊन खासगी टँकर मागवून देत आहेत. 

कन्हेरे येथे कूपनलिका अधिग्रहीत 
कन्हेरे (ता. अमळनेर) येथे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे. या पार्श्वभूमीवर कोळपिंप्री शिवारातील रमेश सुका पाटील यांची कूपनलिका अधिग्रहीत केली आहे. वापरण्यासाठी ग्रामस्थांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. पिण्याच्या पाण्यासाठी प्रल्हाद भोसले, उखर्डू पाटील, नाना पाटील यांच्या खासगी विहिरी आधार ठरत आहेत. 

फाफोरे येथे टँकरने पुरवठा 
फाफोरे (ता. अमळनेर) येथील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तीन टँकर सुरू करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत ग्रामस्थांना दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. किशोर आधार पाटील यांनी त्यांच्या मालकीची विहीरीचे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला आहे. 

विकतचे पाणी आधार 
ीभीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी कोळपिंप्री येथील सुदेंन्दू काटे व दीपक काटे यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून थंड व शुद्ध पाणी परिसरातील ग्रामस्थांना व्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. कोळपिंप्रीसह कन्हेरे, फाफोरे, अंबापिंप्री येथे पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामस्थांना सद्यस्थितीत दहा रूपये जारने पाणी उपलब्ध आहे. 

झीर ठरतोय वरदान 
कोळपिंप्री- कन्हेरे दरम्यान बोरी नदीपात्रात पाण्याचा झीर तयार करण्यात आला आहे. हा झीर पंधरा फूट खोल असून, अबालवृद्धांसह महिला या झीरवर पाणी भरण्यासाठी येत आहेत. दुष्काळाच्या काळात हा झीर वरदान ठरला असून, ग्रामस्थांना फायदा होत आहे. अर्धाफूट पाण्याचा बादल्यांनी उपसा करावा लागत आहे. 


गावनिहाय लोकसंख्या 
कोळपिंप्री ः ३ हजार २०० 
अंबापिंप्री ः ३ हजार 
कन्हेरे ः २ हजार ६०० 
फाफोरे ः ३ हजार ४०० 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com