Loksabha 2019 : प्रचारातही फुलतोय आस्था अन्‌ विश्‍वासाचा "गुलाब'! 

राजेश सोनवणे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

काय ताई... दादा बरं आहे ना...! अशी आस्थेने विचारपूस करणारे मनमिळावू व सर्वांची आस्थेने चौकशी करणारे आप्पा... अशी ओळख ऐकली होती. पण, आज प्रत्यक्ष रॅलीत फिरताना अनुभवण्यास मिळाली. विचारपूस करण्यासोबत लक्ष असू द्या... म्हणून मतदान करण्याचे आवाहन होतेच. शिवाय, मतदारांकडून आप्पांवरचा विश्‍वासदेखील त्यांच्या संवादातून उमटला. सकाळी आणि सायंकाळच्या रॅलीत भेटणाऱ्या मतदारांची आस्थेने चौकशी अन्‌ देवकरांबद्दलच्या विश्‍वासातून जणू "गुलाब' फुलत होता. मतदार वेगळे असले, तरी आप्पासाहेबांचा (गुलाबराव देवकर) जोश आणि चालण्याचा वेग तसाच...! 

काय ताई... दादा बरं आहे ना...! अशी आस्थेने विचारपूस करणारे मनमिळावू व सर्वांची आस्थेने चौकशी करणारे आप्पा... अशी ओळख ऐकली होती. पण, आज प्रत्यक्ष रॅलीत फिरताना अनुभवण्यास मिळाली. विचारपूस करण्यासोबत लक्ष असू द्या... म्हणून मतदान करण्याचे आवाहन होतेच. शिवाय, मतदारांकडून आप्पांवरचा विश्‍वासदेखील त्यांच्या संवादातून उमटला. सकाळी आणि सायंकाळच्या रॅलीत भेटणाऱ्या मतदारांची आस्थेने चौकशी अन्‌ देवकरांबद्दलच्या विश्‍वासातून जणू "गुलाब' फुलत होता. मतदार वेगळे असले, तरी आप्पासाहेबांचा (गुलाबराव देवकर) जोश आणि चालण्याचा वेग तसाच...! 

मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने दिवसभर मतदारसंघातील पदाधिकारी- कार्यकर्त्यांशी थेट संपर्क. सोबतच प्रचारफेरी, सभा, रात्री उशिरापर्यंत कोपरा बैठकांमधून मतदारांशी संवाद. लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी गुरुवारी (11 एप्रिल) सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जळगाव शहरातील परिसर पिंजून काढत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. मतदारसंघातील मतदारांच्या भेटी आणि तक्रारी ऐकण्यासाठी दिवस कमी पडू लागल्याचे चित्र आज जळगाव मतदारसंघातील "राष्ट्रवादी'चे उमेदवार माजी पालकमंत्री देवकर यांच्यासोबत एक दिवस घालविल्यानंतर जाणवले. बुधवारी (10 एप्रिल) भडगाव तालुक्‍याच्या दौऱ्यात भडगाव येथे रात्रीची सभा आटोपून घरी येण्यास मध्यरात्रीचे साडेबारा झाले. उशीर झाल्याने आज (11 एप्रिल) सकाळी उठण्यास जरा उशीरच झाला. तरीही सकाळी सहाला उठल्यानंतर रोजचे नित्यनियमाची कामे आटोपली. दिवसभर प्रचारात फिरस्ती होत असल्याने सध्या मॉर्निंग वॉक बंद केले आहे. घरच्यांसोबत थोडा वेळ देऊन सोबतच चहा- नाश्‍ता केल्यानंतर आप्पांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा कार्यालय गाठले. कार्यकर्त्यांना दिवसभरातील प्रचाराच्या सूचना करून काही शिलेदारांसह प्रचारदौरा सुरू झाला. 

आप्पा लाइटनी समस्या सोडवा हो...! 
श्री. देवकर सकाळी आठला प्रचाराचे नियोजन करून शहरातील वाल्मीकनगर परिसरात रॅलीसाठी बाहेर पडले. प्रचाराची गाडी घेऊन वाल्मीकनगरात आल्यानंतर ढोल- ताशांच्या गजरात स्वागत झाले. सकाळी नऊला महर्षी वाल्मीकींच्या मूर्तीचे पूजन करून रॅलीचा प्रारंभ केला. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, पक्षनिरीक्षक करण खलाटे, महिला आघाडीच्या मंगला पाटील, कॉंग्रेसचे डॉ. राधेश्‍याम चौधरी, ज्ञानेश्‍वर कोळी, शशी तायडे, माजी उपमहापौर गणेश सोनवणे, माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे आदी होतेच. जागोजागी महिलांनी औक्षण करण्यासोबतच आपल्या तक्रारी मांडल्या. आप्पा आमच्या भागात लाइट राहत नाही, अंधार असतो. गटारीपण नाहीत... अशाच प्राथमिक तक्रारी मांडल्या. त्या सोडविण्याचे आश्‍वासन देत दोन्ही हात जोडून मतदारांना अभिवादन करीत पुढच्या भागात रॅलीसाठी निघतात. वाल्मीकनगर, जैनाबाद, दाळफड, रिधुरवाडा, चौघुले प्लॉट या भागांतील रॅलीत भेटणाऱ्या प्रत्येकाशी दोन शब्द बोलून चालत पुढे जातात. 

कार्यकर्त्यांशी थोडा संवाद अन्‌ जेवण 
वाल्मीकनगर परिसरातील प्रचार रॅली दुपारी साडेबाराला आटोपून प्रचाराच्या गाड्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाकडे मार्गस्थ झाल्या. या ठिकाणी थोडा वेळ बसून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुन्हा प्रचारासंबंधी सूचना दिल्या. कडक उन्हात प्रचार रॅलीत फिरत असताना कार्यकर्त्यांतून एकजण थंड पाण्याची बाटली आणून देत असतो. यानंतर थोडे रिलॅक्‍स होऊन काही बैठका घेतल्या. अडीचच्या सुमारास घरी जेवणासाठी गेले. प्रचारात बाहेर फिरणे असले, तरी जेवण शक्‍यतो घरचेच. हाच दिवसभर "फिट' राहण्याचा आप्पांचा मंत्र. मध्येच भ्रमणध्वनीवरून इतर ठिकाणच्या प्रचाराची माहिती घेतली. 

सावन आया झुमके; आप्पा को लाओ चुनके...! 
जळगाव शहरातील दुसऱ्या टप्प्यातील प्रचार रॅली सायंकाळी जुन्या जळगावातून निघाली. ग्रामदैवत श्रीराम मंदिरात जाऊन देवकरांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन रॅलीस सुरवात केली. तत्पूर्वी, रथ चौकात माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांच्या घरी जाऊन भेट घेत दहा- पंधरा मिनिटे चर्चा केली. यानंतर प्रचार रॅलीला सुरवात केली. ठिकठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करून आणि फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात येत होते. मंदिरापासून निघाल्यानंतर आरती घेऊन उभ्या असलेल्या महिला औक्षण करून देवकरांच्या गळ्यात हार व नारळ देत होते. रॅलीत मुलेदेखील "राष्ट्रवादी'चा झेंडा घेऊन सहभागी होते. इतकेच नाही, तर चिमुकल्यांनी चेहऱ्यावर देवकरांचा मुखवटा लावलेला होता. यावेळी लहानांसह कार्यकर्ते "सावन आया झुमके, आप्पा को लाओ चुनके...' अशा घोषणा देत होते. रॅलीदरम्यान बुद्धविहार व विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विठ्ठलपेठ परिसरात खडके परिवारातील रमेश खडके यांचे निधन झाले असून, त्यांचे लहान बंधू चंद्रकांत खडके यांच्याजवळ दोन मिनिटे बसून देवकरांनी विचारपूस केली. 

- वाल्मीकनगरातून प्रचार रॅलीचा प्रारंभ. 
- रॅलीत मतदारांशी संवाद, विचारपूस. 
- मुलांच्या चेहऱ्यावर देवकरांचा मुखवटा. 
- ठिकठिकाणी स्वागत अन्‌ औक्षण. 
- सकाळपासून- सायंकाळपर्यंत उत्साह कायम. 

 

Web Title: marathi news jalgaon gulabrao devkar one day with candidate