खरीप हंगामासाठी 25 मे नंतरच पेरणी करा : पालकमंत्री पाटील 

gulabrao patil
gulabrao patil

जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शेतकरी गट/उत्पादक कंपन्यांमार्फत बी-बियाणे व खते बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खते वेळेवर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असली तरी त्यांनी बागायती कापसाची लागवड 25 मे नंतरच करण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. 

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आज झाली यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी वैभव शिंदे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे समन्वयक अरुण प्रकाश, विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री. शेख, जळगाव जिल्हा मध्यवती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख आदि उपस्थित होते. 
जिल्ह्यात कापूस पिकाखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बागायती कापूस पीकाची लागवड करताना शेतकऱ्यांना पीकाला पाणी देता यावे याकरीता वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना लागवडीच्या काळात आठवड्यातून किमान चार दिवस दिवसा वीज उपलब्ध करुन द्यावी. वीज वितरणाचे वेळापत्रक बदलण्यासाठी आवश्‍यकता भासल्यास उर्जामंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. 
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी प्रयोगशाळा तयार कराव्यात. याशिवाय शेतकऱ्यांना लावगडीसाठी भांडवलाची आवश्‍यकता असते ही बाब लक्षात घेता बॅंकांनी लवकरात लवकर पीककर्जाचे वाटप करावे. जिल्ह्यातील लहान गावांमध्ये शक्‍यतो एकाच दिवशी पेरणी करावी. 

धूळ पेरणी करू नकोच 
शेतकऱ्यांनी शक्‍यतो धुळ पेरणी करु नये; तर बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रीया करुनच पेरणी करावी. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा. 

पक्के बिल घ्या 
एकाच पिकावर विसंबुन न राहता मुख्य पिकाबरोबर आतंरपीक व मिस्त्रपिक घ्यावे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलल्या बीयाणे, खतांचे पक्के बील विक्रेत्याकडून घ्यावे. तसेच सदरचे बील हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे. याशिवाय शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी गटशेतीचा अवलंब करण्याचे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. 

गिरणाचे आवर्तन सोडा 
कर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही; याची दक्षता घ्यावी. पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होवू नये याकरीता गिरणाचे एक आर्वतन पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्ह्यातील नागरीकांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावा; याकरीता कृषि विभागाची जास्तीत जास्त कामे नरेगाच्या माध्यमातून करावीत. 

शेतमाल विक्रीच्या वाहनांचा हिरवी झेंडी 
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 64.66 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आल्याचे जितेंद्र देशमुख यांनी सांगितले. 
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे याकरीता बालक ते पालक या तत्वानुसार मुलगा व वडील या दोघांनाही प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात अकराशे शेतीशाळा घेण्याचे कृषि विभागाचे नियोजन असून गटशेतीच्या माध्यमातून एक गट एक वाण हा उपक्रम राबविणार असल्याचे कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी ते ग्राहक संकल्पनेनुसार जिल्ह्यातील विविध प्रकारचा शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com