जिवावर उठलेल्या महामार्गाला पर्याय देणार कधी? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

जळगाव : महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा विषय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असताना महापालिकेने या रस्त्यांची जबाबदारी घेतली. नंतर आर्थिक स्थितीअभावी "हात वर' करत या रस्त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे दोन दशकांपासून केवळ चर्चा होऊन समांतर रस्त्यांचा विषय मार्गी लागलाच नाही. त्यामुळे जिवावर उठलेल्या महामार्गाला पर्याय कधी देणार, असा प्रश्‍न शहरवासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, आज महामार्गाने आणखी एका दुचाकीस्वार माजी सैनिकाचा बळी घेतला आहे. 

जळगाव : महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा विषय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असताना महापालिकेने या रस्त्यांची जबाबदारी घेतली. नंतर आर्थिक स्थितीअभावी "हात वर' करत या रस्त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे दोन दशकांपासून केवळ चर्चा होऊन समांतर रस्त्यांचा विषय मार्गी लागलाच नाही. त्यामुळे जिवावर उठलेल्या महामार्गाला पर्याय कधी देणार, असा प्रश्‍न शहरवासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, आज महामार्गाने आणखी एका दुचाकीस्वार माजी सैनिकाचा बळी घेतला आहे. 
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा टप्पा बांभोरी पुलापासून थेट तरसोद फाट्यापर्यंत असा तब्बल अकरा किलोमीटरचा आहे. त्यातील आहुजानगर ते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या नऊ किलोमीटरच्या परिसरात महामार्गाच्या दुतर्फा चारही दिशांना शहर विकसित झाल्याने या टप्प्यात महामार्गावरून तसेच विविध ठिकाणच्या आठ चौकांतून जा-ये करणारे जवळपास एक लाखावर नागरिक आहेत. महामार्गावरील अवजड वाहने, भरधाव धावणारे वाळूचे डंपर- ट्रॅक्‍टर कधी दुचाकी, सायकलस्वार, पादचाऱ्यांच्या जिवावर उठतील, याचा भरवसा नाही. हजारो नागरिकांचा बळी या महामार्गाने घेतलेला असताना, या मार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा विषय गेल्या दोन दशकांमध्ये मार्गी लागू शकलेला नाही, हे जळगावकरांचे दुर्दैवच. 

महापालिकेच्या हस्तक्षेपाने "खोडा' 
महामार्गालगतचे समांतर रस्ते विकसित करण्याची जबाबदारी महापालिकेने स्वत:कडे घेत महामार्ग प्राधिकरणाच्या या विषयास हात घातला. त्यासाठी 2011-12 या आर्थिक वर्षात महापालिकेने अंदाजपत्रकातही समांतर रस्त्यांसाठी खर्चाची तरतूद केली. मात्र, आधीच कर्जाचा डोंगर असलेल्या महापालिकेस हे काम हाती घेणे शक्‍यच नव्हते. पुढे तेच झाले. महापालिकेने आर्थिक कारण पुढे करत या कामाबाबत "हात वर' केले आणि हा विषय पुन्हा चिघळला. 

समांतर रस्त्यांसाठी आंदोलन 
गेल्या काही महिन्यांत समांतर रस्त्यांसाठी जळगावकर रस्त्यावर उतरले. दोन-तीन वेळा आंदोलने, स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्या- त्या वेळी रस्त्यांची चर्चा खूप झाली, नंतर हा विषय थंडबस्त्यात गेला. महापालिकेचा हस्तक्षेप आणि केंद्र सरकारची उदासीनता यांमुळे समांतर रस्ते अद्याप जळगावकरांसाठी स्वप्नच आहे. 
 
"डीपीआर' मंजुरीसाठी केंद्राकडे... 
वीस वर्षांपासून मागणी असूनही समांतर रस्त्यांचा विषय मार्गी लागलेला नाही. अलीकडे गेल्या वर्षभरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू झाले. मात्र, चौपदरी मार्ग जळगाव शहराबाहेरून जात असल्याने आता शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या विस्तारासह समांतर रस्त्यांच्या कामाचा विषय ऐरणीवर आहे. केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी या कामास मंजुरी दिली असून, त्यासाठी 139 कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार असून, तो मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. तो मंजूर झाल्यानंतर निविदाप्रक्रिया होऊन नंतर काम सुरू होईल. त्यासाठी आणखी किमान दोन वर्षे जातील, असे बोलले जाते. 

Web Title: marathi news jalgaon haiway pararall raod