"कोरोना' रुग्णांबाबत प्रशासनाचा सावळा गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

जळगावातील दोन "पॉझिटिव्ह' रुग्णांची माहिती देण्याबाबत महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीत तफावत येत असल्याने सावळा गोंधळ उघड झाला आहे.

जळगाव : "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यांच्यातील गोंधळही मिटायला तयार नाही. आरोग्य यंत्रणेतील मुख्य मानले जाणारे जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांच्यातील परस्पर मतभेद उघड असताना जळगावातील दोन "पॉझिटिव्ह' रुग्णांची माहिती देण्याबाबत महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीत तफावत येत असल्याने सावळा गोंधळ उघड झाला आहे. 
"कोरोना'चा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्ह्यातील "पॉझिटिव्ह' रुग्णांचा आकडा 163 वर पोहोचला आहे. आकडा वाढत असताना प्रशासनाकडून देखील कोणत्याही प्रकारची कडक नियमावली न लावता अगदी "लॉकडाउन' खुला करण्याचेच काम करण्यात येत आहे. आता 17 मेपर्यंत "कर्फ्यू' लावण्यात आला असला, तरी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना रोखण्याचे काम प्रशासनाकडून होते की नाही, याकडे लक्ष लागले आहे; तर दुसरीकडे "कोरोना पॉझिटिव्ह' आढळून येणाऱ्या रुग्णांबाबतच्या माहितीतही समन्वय राखला जायला हवा. 

जळगावच्या रुग्णांबाबत भिन्नता 
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 33 रुग्णांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आढळून आले. यात सायंकाळी जळगाव शहरातील दोघांचे अहवाल "पॉझिटिव्ह' होते. परंतु हे दोन्ही रुग्ण शहरातील कोणत्या भागातील आहेत, याबाबत जिल्हा आरोग्य विभाग, महापालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनाच पूर्णपणे माहिती नव्हती. तिन्ही विभागांकडून सांगण्यात आलेल्या माहितीत भिन्नता आढळून आली. यामुळे नेमका कोणता परिसर "सील' करावयाचा हा प्रश्‍न समोर उभा राहिला. 

गणपतीनगर की जुने जळगाव 
जळगावातील दोन रुग्ण कोणत्या परिसरातील आहेत, याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होऊ शकला नाही. परंतु जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सांगण्यानुसार दोन्ही रुग्णांनी तपासणी खासगी लॅबमध्ये केलेली असून, दोन्ही रुग्ण जुन्या जळगावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तर याच रुग्णांबाबत जिल्हा माहिती कार्यालय अर्थात जिल्हा प्रशासनाकडून एक रुग्ण गोधडीपाडा सोसायटी आणि दुसरा रुग्ण जुन्या जळगावातील मारुती पेठेतील आणि महापालिका आरोग्य विभागाला हे दोन्ही रुग्ण शहरातील नसल्याचेच सांगण्यात येत होते. त्यामुळे तिन्ही विभागांकडून सांगण्यात येणाऱ्या माहितीत तफावत दिसून आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon health department confusion corona virus patient