चौपदरीकरणासाठी महामार्गालगतचे वृक्ष तोडणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

जळगाव : शहरातून जाणाऱ्या आठ किलोमीटरच्या टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाची ऑनलाइन निविदा प्रसिद्ध झाल्याने समांतर रस्ते कृती समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करीत पेढे वाटून समितीने आनंद व्यक्त केला. दरम्यान, आता महामार्गास अडथळा ठरणाऱ्या वृक्षतोडीसह वीजखांब, तारा व जलवाहिन्या स्थलांतरासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

जळगाव शहरात महामार्ग चौपदरीकरणाची 69 कोटी 26 लाख रुपये खर्चाची निविदा आज प्रसिद्ध झाली. समांतर रस्ते कृती समितीने 15 ते 26 नोव्हेंबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले होते. 

पेढेवाटप अन्‌ नृत्य 
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना पेढे भरविण्यात आले. ढोल- ताशांच्या गजरात नृत्य करीत जळगावकरांना पेढे वाटप करण्यात आले. समांतर रस्ते कृती समितीचे सदस्य नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अनंत जोशी, डॉ. राधेश्‍याम चौधरी, फारुख शेख, सुशील नवाल, दिलीप तिवारी, अरविंद देशमुख, पृथ्वीराज सोनवणे, गजानन मालपुरे, विनोद देशमुख, सरिता माळी, शोभा चौधरी, राजी नायर, वैशाली पाटील, गनी मेमन, अमित जगताप आदी या जल्लोषात सहभागी झाले. 

वीजखांब, जलवाहिनी स्थलांतरासाठी प्रयत्न 
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात छोटेखानी बैठक झाली. निविदा मार्गी लागल्यानंतर आता महामार्गावरील वीजवाहिन्या स्थलांतराचा पाठपुरावा करायचे ठरले. वीज मंडळाने पाच कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी जिल्हा विकास नियोजन समितीतून निधी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. सोमवारपर्यंत (24 डिसेंबर) महामार्गास अडथळा ठरणारे वृक्ष मोजून ते तोडण्याची परवानगी महापालिका वृक्ष समितीकडून घेऊ, असेही सांगण्यात आले. 

Web Title: marathi news jalgaon highway 4 way tree cuting