रखडलेले चौपदरीकरण : अडचण की आव्हान! 

रखडलेले चौपदरीकरण : अडचण की आव्हान! 

जळगाव जिल्ह्याच्या व विशेषत: जळगाव लोकसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे महामार्ग चौपदरीकरण म्हणजे "ग्रहण' लागलेले कामच म्हणावे लागेल. थेट जिवाशी संबंधित असलेल्या या कामास मंजुरी मिळून दहा वर्षे झालीत, तरी ते पूर्ण होऊ शकलेले नाही. या क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटलांनी चौपदरीकरण तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही दिलीय खरी... पण, त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागणार आहे, नव्हे तर ते नवनिर्वाचित खासदारांपुढचे आव्हानच आहे.. 

राष्ट्रीय महामार्गावर पाळधीजवळ रविवारी सकाळी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाहनास अपघात झाला.. सुदैवाने त्यात कुणालाही दुखापत झाली नसली तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. तसे तर या महामार्गाने अनेक अपघात पाहिले, ते पचविले.. अनेकांचे बळी घेतले.. पण, कोणत्याही विकासाविना तो तसाच स्थितप्रज्ञ आहे. कारण काय, तर हे अपघात कमी करण्यासाठी म्हणून या महामार्गाच्या चौपदरीकरणाची जी काही प्रक्रिया सुरू आहे, तिला कुठेही अंत नाही, असेच म्हणावे लागेल. 
वस्तुत: 2011 पासून रखडलेल्या या कामाला केंद्रात मोदी सरकार आल्यानंतरच्या पहिल्या 2014 च्या टर्ममध्ये मुहूर्त लागून ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने प्रयत्नही खूप झालेत. फागणे- तरसोद आणि तरसोद- चिखली अशा दोन टप्प्यात काम विभाजित करून दोघा वेगळ्या मक्तेदार एजन्सीला ते देण्यात आले.. दोघेही कामे सुरू झालीत, तुलनेने फागणे- तरसोद काम लवकर होईल, असे वाटत होते. मात्र, वर्षभरापूर्वी ते काम बंद पडले, ते आजपर्यंत त्याच बंद अवस्थेत आहे. मक्तेदार एजन्सीला या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. काम सुरू होऊन ते बंद पडले की, अधिक त्रासदायक असते. जळगाव- औरंगाबाद रस्त्याची अवस्था तर अपूर्ण कामामुळे खूपच बिकट झालीय.. 
केंद्रातील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरींचा उल्लेख होतो. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये भूपृष्ठ वाहतुकीचे खाते पुन्हा त्यांच्याकडेच सोपविण्यात आलेय. त्यामुळे रस्त्यांची जी काही कामे अपूर्ण आहेत, ती हमखास पूर्ण होतील, असा विश्‍वास निर्माण झालांय. स्वाभाविकत: फागणे- तरसोद आणि जळगाव- औरंगाबाद रखडलेल्या चौपदरीकरणासह जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरण व समांतर रस्त्यांचे काम या टर्ममध्ये मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. अर्थात, त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागणार आहे. 
जळगाव लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी "कॉफी विथ सकाळ'मध्ये विकासाचे व्हीजन मांडताना सिंचन प्रकल्पांसह महामार्ग चौपदरीकरणाची कामेही प्रायॉरिटी अजेंड्यावर घेतली आहेत. त्यांच्या सोबतीला राज्यातील वजनदार मंत्री गिरीश महाजन आहेतच, त्यामुळे या टर्ममध्येच, नव्हे तर येत्या वर्षभरात या दोन्हीही रस्त्यांच्या चौपदरीकरणाच्या उद्‌घाटनाला पंतप्रधान मोदी, गडकरी आल्याचे बघायला मिळेल, अशी अपेक्षा करुया..! 
 
प्रत्येक खासदारच मंत्री 
मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी एका चॅनेलवाल्याने नव्यानेच निवडून भाजप खासदार म्हणून निवडून आलेल्या भोजपुरी सिनेमातील अभिनेता रवी किशन यांना मंत्रिपदाबाबत छेडले. त्यावर त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत उत्तर दिले... "मोदींच्या नेतृत्वात निवडून आलो, ही मोठी गोष्ट आहे. भाजप-रालोआचेच सरकार आहे, त्यामुळे आमच्या पक्षातील प्रत्येक खासदार मंत्रीच आहे. आमच्या कामांना कोण नाकारू शकेल, त्यामुळे मंत्रिपदाची आवश्‍यकता काय?' त्यामुळे जिल्ह्यातील खासदारही मंत्र्याप्रमाणेच काम करतील, असे मानायला हरकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com