कार वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्‍टर पलटी; एकाचा जागीच मृत्यू

trackter accident
trackter accident

जळगाव : ममुराबाद येथून कडब्याचा चारा घेवून जाणाऱ्या ट्रॅक्‍टर चालकाने समोरन भरधाव वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या कारला वाचविण्यासाठी अर्जंट ब्रेक मारला. यात ट्रॉलीचा हुक तुटून ट्रॅक्‍टर पलटी होवून त्या खाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर महामार्गावर दुपारी दोनच्या सुमारास घडली. 
अंजळगाव (ता. भडगाव) येथील राहणारा दीपक जगन्नाथ महाजन (वय 30) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. गावातील महारू पाटील यांनी ममुराबाद येथे विकत घेतलेला कडब्याचा चारा घेण्यासाठी दीपक आणि त्याचा चुलत भाऊ माहेन रमेश महाजन हे वेगवेगळ्या ट्रॅक्‍टरवर सकाळी ममुराबाद येथे आले होते. दरम्यान चारा घेवून दोन्ही ट्रॅक्‍टर अंजळगाव या आपल्या गावी परतत असताना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर महामार्गावर अपघात झाला. दीपक महाजन हा ट्रॅक्‍टर (क्र. एमएच 19 बीजी 5237) चालवत होता. तर त्याच्या मागे चुलत भाऊ मोहन दुसरे ट्रॅक्‍टर चालवत होता. दरम्यान पाळधीकडून भरधाव वेगाने ओव्हरटेक करत येणारी कार (क्र. एमएच 20, बीवाय 4500) ट्रॅक्‍टरवर धडकेल म्हणून कारला वाचविण्यासाठी दीपकने अर्जंट ब्रेक मारला. यात ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॉली पलटी झाली. सोबत ट्रॅक्‍टर देखील उलटे होवून त्याखाली दीपक दबला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

दोन्ही मुले झाली पोरकी 
दीपक महाजन याच्या पश्‍चात आई वत्सलाबाई, वडील जगन्नाथ, पत्नी भावना, मुलगा लकी (वय 5) व हितेश (वय दीड वर्ष), भाऊ देवानंद असा परिवार आहे. दीपक हा घरातील मोठा मुलगा असून, दीपकच्या मृत्यूने दोन्ही लहान मुले पोरके झाले. 

वडील रूग्णालयातच पडले बेशुद्ध 
सकाळी घरातून चारा घेण्यासाठी गेलेला दीपक दुपारी घरी येईल; अशी आशा होती. परंतु घरी पोहचण्यापुर्वीच दीपकचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. दीपकचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन कक्षात ठेवला होता. वडील जगन्नाथ महाजन, भाऊ देवानंद, मावशी इंदूबाई, मावसभाऊ रवींद्र हे रूग्णालयात आले होते. घरातील करता मुलगा गेल्याने कुटूंबियांचा आक्रोश सुरू होता. वडील बाहेरच बसून रडत असताना ते बेशुद्ध पडले. त्यांना लागलीच उपचारासाठी आत नेण्यात आले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com