"होमगार्ड' चार महिन्यापासून मानधनाविनाच 

"होमगार्ड' चार महिन्यापासून मानधनाविनाच 

जळगाव ः कोणतेही सण उत्सव, निवडणुकांमध्ये पोलिसांच्या बरोबरीने काम करतो तो होमगार्ड. तपासणी यंत्रणेचा भाग सोडला तर बंदोबस्तावर चोवीस तास पहारा देणाऱ्या जिल्ह्यातील होमगार्ड बांधवांचे मानधन गेल्या चार महिन्यापासून रखडले आहे. चार दिवसानंतर गणेशोत्सवाचा बंदोबस्त लावला जाणार असून त्याची तयारी सुरू आहे. 

या आहेत अडचणी.. 
जिल्ह्यातील होमगार्डसला वर्षातील काही दिवसच काम मिळते. यामुळे ते पार्टटाइम इतर व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. रमजान ईद, बकरी ईद, मराठा आंदोलन आदी ठिकाणी ड्यूटी केलेल्यांचे मानधन अद्यापही होमगार्डला मिळालेले नाही. चार वर्षांपासून होमगार्डला नवीन गणवेश मिळालेला नाही. अधिकाऱ्यांना अनेक कामानिमित्त, घडलेल्या घटनांची माहिती देण्यासाठी मोबाईल, फोन लावावा लागतो. तो खर्चही होमगार्डला मिळत नाही. ऑनलाइन ड्यूटीमुळे जिल्ह्यात मिळेल त्याठिकाणी ड्यूटीला जावे लागते. एस.टी.चा खर्च परवडत नाही. मानधन मिळते चारशे रुपये अन जाण्यायेण्यासाठी खर्च होतो तीनशे रुपये. यामुळे ऑनलाइन ड्यूटी न लावता स्थानिक स्तरावर ड्यूटी लावण्याची मागणी होत आहे. 
 
महापालिकेचा बूथ भत्ता बाकी 
जळगाव महापालिकेची नुकतीच निवडणूक झाली. हजार होमगार्डची विविध मतदान बूथवर नेमणूक केली होती. 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2019 दरम्यान सात दिवस सतत ड्यूटी होमगार्डनी केली. त्यांचा मिळणारा बूथ भत्ता अद्यापही मिळालेला नाही. 
 
मानधनाची प्रतीक्षा 
पोलिसांना आम्ही बंदोबस्त देतो. बंदोबस्ताचे तास पाहून आम्ही शासनाकडून मानधन मागवितो. त्याची बिले कोशागार कार्यालयात पाठवितो. त्यांनी बिले पास केले केली की मानधन जमा होते. मानधनाची बिले कोशागार कार्यालयात पाठविली आहेत. लवकरच ती अदा केली जातील, अशी माहिती जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

"ऑनलाइन' ड्यूटीमुळे बंदोबस्तात अडचणी 
पूर्वी होमगार्डचा बंदोबस्त जिल्हा स्तर व तालुकास्तरावरून लावला जात असे. यामुळे होमगार्ड ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाणी व ड्यूटीचे ठिकाण जवळ होते. आतामात्र मुंबईच्या होमगार्ड कार्यालयातून बंदोबस्त लावला जातो. यात कोणाचीही ड्यूटी अंतराचा (कमी जास्त अंतर) विचार न करता लावली जाते. मानधनाच्या तुलनेत ड्यूटी परवडत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावरच ड्यूटी लावण्याचे अधिकार देण्याची मागणी होत आहे. 
 
जिल्ह्यात होमगार्ड--2 हजार 458 
पुरुष होमगार्ड--2252 
महिला होमगार्ड--206 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com