जुन्या वादातून दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

जळगाव : शहरात आठ ते दहा वर्षांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी मेहरुणच्या एकनाथनगरात एका दाम्पत्याच्या घराबाहेर सिनेस्टाईल मारहाण करण्यात आल्याची घटना आज (ता. 15) सायंकाळी घडली. रिक्षातून आलेल्या 5 ते 6 गुंडांनी घराबाहेरच महिलेच्या डोक्‍यात बिअरची बाटली मारून तिला जखमी केले. पत्नीला सोडवायला आलेल्या पतीला चाकू लावून फायटरने डोळ्यावर मारून गंभीर जखमी करण्यात आले. अंबादास व सुनीता वंजारी या दाम्पत्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जखमींनी दिलेल्या जबाबात नमूद केल्यानुसार, मेहरूण परिसरातील एकनाथनगरातील रहिवासी तथा रिक्षाचालक अंबादास सुकदेव वंजारी (वय 45) पत्नी सुनीता अंबादास वंजारी (वय 40) सह दोन मुले व दोन सुनांसह वास्तव्यास आहेत. साधारण 10 वर्षांपूर्वी त्याच गल्लीत राहणाऱ्या एका तरुणाशी त्यांचा वाद झाला होता. त्याच पूर्ववैमनस्यातून आज सायंकाळी पाचच्या सुमारास ऍपेरिक्षात 5 ते 6 साथीदारांसह लहान्या व प्रशांत कोळी अंबादास वंजारी यांच्या घरी धडकले. सुनीता या घरासमोरच बसलेल्या असताना मागील भांडणाची कुरापत काढत त्यांच्या डोक्‍यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. आपल्या पत्नीला मारहाण करत असल्याचे पाहून अंबादास वंजारी यांनी धाव घेतली असता त्यातील एकाने त्यांना अडवून चाकू लावला आणि दुसऱ्या फायटरने त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर वार केले. मारेकरी इतक्‍यावरच थांबले नाही तर त्यांनी जखमी झालेले असतानाही अंबादास यांच्या डोक्‍यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. सासू सासऱ्यांना कोणीतरी मारहाण करीत असल्याचे पाहून मोठा मुलगा राहुलची पत्नी सोनू आली, मारेकऱ्यांनी या गर्भवतीलाही सोडले नाही. तिला जमिनीवर ढकलून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून घेत रिक्षात बसून पळ काढला. 

गल्लीत एकच धावपळ 
वंजारी पती-पत्नीवर अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे गल्लीत एकच धावपळ उडाली. काय झाले म्हणून मदतीला धावणाऱ्यांनाही रिक्षातून आलेल्या गुंडांनी शस्त्राचा धाक दाखवत धमकावले. हल्लेखोर निघून गेल्यावर गल्लीतील तरुणांनी दोघांना जखमी अवस्थेत जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दखल केले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. जखमींनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयितांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली असून, त्याचा शोध सुरू आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon husband wife choper halla