"इनकमिंग नेटवर्क'ची निष्ठा कशी तपासणार..? 

"इनकमिंग नेटवर्क'ची निष्ठा कशी तपासणार..? 

लोकसभा निवडणुकीआधी आणि नंतरही; आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपत अन्य पक्षांमधून जोरदार "इनकमिंग' सुरू आहे. या "इनकमिंग'वरून पक्षातील नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत, विविध नेत्यांच्या वक्तव्यावरून ते समोरही येताहेत.. काल-परवा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंनी केलेले "पक्षात नव्याने येत असलेल्या नेत्यांच्या निष्ठा तपासा' हे विधान त्यासंबंधी सूचक संकेत देणारे असले तरी मुळात "निष्ठा' तपासण्याचे तंत्र अथवा ती मोजण्याचे परिमाण भाजपकडे आहे का? आणि विशेष म्हणजे, पक्षातील निष्ठावंतांना बाजूला करत ज्यांनी हे आयत्यावेळचे "इनकमिंग नेटवर्क' आपल्याभोवती जमा केलंय, त्या नेत्यांच्या निष्ठेचं काय? 

भाजपच्या विविध निवडणुकांमधील यशाचा वारू देशभर उधळतोय.. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांतील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला विशेष यश मिळाले, लोकसभा निवडणुकीचा "रिझल्ट' भाजपसाठी अपेक्षेपेक्षा चांगला लागला. त्यामुळे "मोदी-2' या भाजप सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या सुरवातीलाच विरोधी पक्षांना आणखी काही धक्के बसणे सुरू झाले. त्याची सुरवातही आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता महाराष्ट्रातून होणे स्वाभाविक होते. त्यामुळे गेल्या पंचवार्षिकप्रमाणेच नव्याने भाजपकडे अन्य पक्षांमधून येणाऱ्या नेते, पदाधिकाऱ्यांचा ओढा वाढलांय.. 
पक्षांना विस्तारासाठी असे "बेरजेचे राजकारण' करावे लागते. पण, ज्यावेळी पक्ष विरोधात असतो आणि सत्ताप्राप्ती हेच त्याचे लक्ष्य असते, त्यावेळी असे बेरजेचे राजकारण केले तर समजू शकते. अगदी सर्व पातळीवर सत्ता असताना अगदी विरोधी वैचारिक बांधिलकी असलेल्या पक्षातून नेत्यांना घेण्याची भाजपला गरज काय? हा प्रश्‍न त्यामुळेच उपस्थित होत आहे. बरं, अन्य पक्षीयांचे हे "इनकमिंग' सुरू असताना "केडरबेस्ड्‌' म्हणविणाऱ्या भाजपतील खरे "केडर' अडगळीत पडत चालल्याचे विदारक वास्तवही त्यानिमित्ताने समोर येत आहे. आता, या चित्राकडे पाहायला "इनकमिंग'चे स्वागत करणाऱ्या नेत्यांना वेळ नाही, की ते त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करतांय, हे त्यांनाच ठाऊक. पण, त्यामुळे भाजपतील "केडर' कमालीचे अस्वस्थ आहे, एवढे नक्की. 
या "इनकमिंग'वरून भाजपत मतप्रवाह आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरींपासून आता काल-परवा जिल्ह्याच्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत माजीमंत्री खडसेंनीही याच मुद्याला धरून "येणाऱ्यांच्या निष्ठा तपासा' असे विधान केले. सोबतच आपल्यात येऊन ते विरोधात काम करतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. परंतु, जे लोक सत्तासुंदरीचे स्वप्न पाहत भाजपत दाखल होत आहेत, त्या संधीसाधूंची निष्ठा गडकरी, खडसे काय किंवा महाजन- फडणवीस तरी कशी तपासतील? 
तीन-चार दशके पक्षात निष्ठेने काम केल्यानंतर खडसे आज पक्षाच्या मुख्य प्रवाहात नाहीत, आणि "इनकमिंग'मधील काहींना थेट मंत्रिपद देण्यात आल्याने खडसेंची अस्वस्थता समजण्याजोगी आहे. या स्थितीत आज खडसे "जात्यात' आहे, तर पक्षातील इतर नेते "सुपात' असे म्हटले तरी वावगे ठरू नये. केवळ "इनकमिंग'ला महत्त्व देत भाजपनेते निष्ठावंतांना डावलत असतील तर पक्षाचा पाया असलेले मूळ "केडर' सत्तेची इमारत कधी खाली खेचेल, हे सत्ताधीशांनाही कळणारही नाही. त्यामुळे भाजपनेत्यांनी "निष्ठा' तपासण्याचे तंत्र विकसित करून, ती मोजण्याचे परिणाम सोबत घेऊनच पक्षप्रवेश सोहळे साजरे करणे उचित ठरेल, असे वाटते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com