शेतीत गुंतवणूक करण्यावर सरकारचा भर : रावसाहेब दानवे

शेतीत गुंतवणूक करण्यावर सरकारचा भर : रावसाहेब दानवे

जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाच्या या अजेंड्याला विरोधकांकडे उत्तर नाही, म्हणून जाती-जातींत द्वेष पसरविण्याचे राजकारण त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र, तरीही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपच सत्तेत येईल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. 
महापालिका निवडणुकीनिमित्ताने जळगाव दौऱ्यावर आलेल्या दानवेंनी सायंकाळी "सकाळ' खानदेश आवृत्तीच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयास आज सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, विभागीय संघटनमंत्री ऍड. किशोर काळकर यावेळी उपस्थित होते. या भेटीत दानवेंनी पक्षसंघटन, रचना, आगामी निवडणुकांचे नियोजन, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, सरकारच्या योजना, विकासाचा अजेंडा आदी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली. 

पक्षसंघटन मजबूत, सज्ज 
आगामी वर्ष निवडणुकांचे आहे, त्यासाठी आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय बूथरचना मजबूत करून ठेवली आहे. प्रत्येक बूथवर आमचा प्रमुख व त्यासोबत 25 तरुण कार्यरत असून त्यांच्याकडे प्रत्येकी 60 मतदारांची जबाबदारी सोपविली आहे. असे राज्यभरात 288 मतदारसंघांत 83 हजार कार्यकर्ते नियुक्त केलेले आहेत. अशा प्रकारच्या नियोजित संघटनावर आम्ही उत्तर प्रदेश, गुजरात, नागालॅंड, त्रिपुरा आणि कर्नाटकात यश मिळविले. आता राज्यात व देशातही याचप्रकारे नियोजन करण्यात आले असून, त्यावर थेट राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे नियंत्रण असल्याचे दानवे म्हणाले. 

त्यांचे 7, आमचे 34 हजार कोटी 
शेतकरी कर्जमाफी योजनेतील अडचणींबाबत विचारले असता दानवे म्हणाले, की यूपीए सरकारने सात हजार कोटींची कर्जमाफी केली, त्यासाठी 22 महिने घेतले. उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांनी प्रत्येकी एक लाखाचे कर्ज माफ केले. आम्ही 34 हजार कोटींच्या कर्जमाफीची योजना आणली. सुरवातीला कुटुंबातील एक व नंतर सर्व सदस्यांचा त्यात समावेश केला. ऑनलाइन प्रक्रियेमुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. यूपीए सरकारच्या कार्यकाळातील कर्जमाफीने त्यांच्याच ताब्यातील बॅंकांचे भले झाले, असा दावा दानवेंनी केला. 

शेतीत शासनाची गुंतवणूक 
शेतीत शासनाची गुंतवणूक वाढल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही. त्यासाठीच आम्ही जलयुक्त शिवार, गाळयुक्त धरण अशा योजना आणल्या व त्या यशस्वीपणे राबविल्याही. आणेवारी जाहीर करण्याची पद्धत आम्ही बदलली. आमच्या सरकारपूर्वी विम्याची रक्कम मोजकेच शेतकरी भरत होते, त्याचा लाभही त्यांनाच मिळत होता. देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर विमा भरणाऱ्यांची व त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा आम्ही केली, यापूर्वी ती कोणत्याही सरकारने केली नाही. 

विकासाच्या अजेंड्यास उत्तर नाही 
भाजपने देशात, राज्यात विकासाचा अजेंडा राबविला आहे. त्याला विरोधकांकडे कोणतेही उत्तर नाही. म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून जाती-जातींत द्वेष पसरवून अशांतता पसरविण्याचे काम सुरू आहे. परंतु, त्यांचा हा उद्देश आम्ही सफल होऊ देणार नाही. जनता विकासाच्या बाजूने उभी राहील व भाजप राज्यात व देशातही पुन्हा सत्तेत येईल. कॉंग्रेसला कधीही "अच्छे दिन' येणार नाहीत, असा दावाही दानवे यांनी केला. 

आता आम्ही मोजकेच बोलतो 

गेल्या वर्षभरात नेत्यांची वक्तव्ये व्हायरल होऊन त्या नेत्यांवर माफी मागायचे अनेक प्रसंग आले. काही कारण नसताना चुकीच्या पद्धतीने काही वक्तव्ये मीडियावर दाखविली जातात. त्यामुळे आता रंगतदार भाषण असे काही प्रकार करण्याची भीतीच वाटते. त्यामुळे आता कुठेही बोलताना तयारी करून, मोजकेच बोलत असतो, अशी खंतही दानवे यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com