शेती सोडू नका; विकू नका : कवी महानोर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

जळगाव ः संकट आले की, प्रत्येक मनुष्य हा डगमगेल; पण बलदंड शेतकरी हा कधीच डगमगत नाही. आपण शेती करणे बंद केले, तर सर्व जग बंद होऊ शकते. शेती करताना आता पारंपरिक पद्धतीने होणार नाही. तर यासाठी नवतंत्रज्ञान वापरावे. नवनवीन प्रयोग करून उत्पादन घ्या. परंतु शेती सोडू नका किंवा विकू नका, असे आवाहन कविवर्य ना. धों. महानोर यांनी आज येथे केले. 

जळगाव ः संकट आले की, प्रत्येक मनुष्य हा डगमगेल; पण बलदंड शेतकरी हा कधीच डगमगत नाही. आपण शेती करणे बंद केले, तर सर्व जग बंद होऊ शकते. शेती करताना आता पारंपरिक पद्धतीने होणार नाही. तर यासाठी नवतंत्रज्ञान वापरावे. नवनवीन प्रयोग करून उत्पादन घ्या. परंतु शेती सोडू नका किंवा विकू नका, असे आवाहन कविवर्य ना. धों. महानोर यांनी आज येथे केले. 

कृषी उच्च तंत्रांचा वापर करून कृषी प्रयोगांद्वारे लक्षणीय उत्पादन घेणाऱ्या भूमिपुत्रांचा सपत्नीक "स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, शोभना जैन, विपणन प्रमुख अभय जैन, एस. व्ही. पाटील, जैन फार्मफ्रेशचे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, सुनील गुप्ता, के. बी. पाटील, गौतम देसरडा, डॉ. अनिल ढाके, डॉ. बाळकृष्ण यादव उपस्थित होते. 
कवी महानोर म्हणाले, की शेतीचे अर्थशास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन करावे. शेतीशी संवाद साधा. ती आपल्याला समृद्ध करते. कृतज्ञतापूर्वक काळ्या आईची सेवा केली तर ती विश्वाचे पोट भरते. मी शेतीवर कविता केल्या त्यामुळे जगभर पोहचलो. याच धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधनात्मक पीकपद्धती वापरून सक्षम व्हावे; असे आवाहन करून पीकपद्धतीत फेरपालट करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. काही वेळा जीवनात संघर्षाचा काळ येतो. आपल्याला संघर्ष अटळ आहे. मात्र आपण बलदंड शेतकरी असल्याने त्यावर मात करू शकतो. याकरिता नवीन बियाणे, नव तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी उभे राहावे. के. बी. पाटील यांच्यासह हेमचंद्र पाटील, काशिनाथ पाटील, रवींद्र महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल ढाके यांनी आभार मानले. 

पुरस्काराने सन्मानित शेतकरी 
स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने सन्मानितांमध्ये भाऊसाहेब शेलार (ऐंचाळे, जि. धुळे), सुभाष देसाई (चोपडा), प्रवीण पाटील (खर्डी), साहेबराव इंगळे (वर्णा, जि. बुलडाणा), राजेंद्र चौधरी, रवींद्र महाजन, मोहन महाजन, देवेंद्र चौधरी (सर्व अहिरवाडी, जि. जळगाव), प्रमोद पाटील (तऱ्हाड, जि. धुळे), नरसई पाटील (दामडदा, जि. नंदुरबार), ज्ञानेश्वर पाटील (विखरण, जि. धुळे), शरद चौधरी (नशिराबाद), दीपक महाजन (कर्जोद जि. जळगाव). यात नशिराबाद येथील गणेश ज्ञानेश्वर पाटील यांनी वडिलांच्यावतीने पुरस्कार स्वीकारला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jaiin purskar distribution mahanor