जळगाव जिल्ह्यात 454 गावे झाली जलयुक्त!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

जळगाव ः जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आतापर्यंत 893 गावांची निवड झाली आहे. या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या व होत असलेल्या कामांमुळे या गावांमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 454 गावे प्रकल्प आराखड्यानुसार जलयुक्त झाली आहेत. अभियानामुळे सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंदही तयार झाला आहे. हजारो हेक्‍टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. 

2015-16 मध्ये 232 गावांची निवड झाली होती. या गावांमध्ये विविध यंत्रणांमार्फत सात हजार 316 कामे पूर्ण करण्यात आली. ही गावे शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात या वर्षात 36 हजार 118 टी.सी.एम. साठवण क्षमता निर्माण झाली. 58 हजार 667 हेक्‍टर क्षेत्राला एक पाण्याची पाळी, तर 29 हजार 333 हेक्‍टर क्षेत्राला दोन पाण्याची पाळी देता येईल इतके संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. 2016-17 मध्ये या अभियानात 222 गावांची निवड झाली होती. या गावात चार हजार 856 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी चार हजार 846 कामे पूर्ण झाली असून, 11 कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर आतापर्यंत 124 कोटी 76 लाख 23 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. ही गावेही जलयुक्त झाली आहेत. 
2017-18 मध्ये जिल्ह्यातील 206 गावांची निवड झाली आहे. विविध यंत्रणांमार्फत चार हजार 271 कामे प्रस्तावित केली आहेत. यापैकी एक हजार 207 कामे पूर्ण, तर दोन हजार 394 कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर आतापर्यंत पाच कोटी 38 लाख 64 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच 2018-19 मध्ये जिल्ह्यात 233 गावांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत एक हजार 504 गावांपैकी 893 गावांची निवड करण्यात आली आहे. जामनेर तालुक्‍यातील सर्वाधिक 134 गावांची, अमळनेर तालुक्‍यातील 101, चाळीसगाव तालुक्‍यातील 88 गावे, पारोळा व पाचोरा तालुक्‍यातील प्रत्येकी 73 गावांचा समावेश आहे.

Web Title: marathi news jalgaon jalyukt shivar