जिल्हा बॅंक विरोधात जि. प. हायकोर्टात! 

जिल्हा बॅंक विरोधात जि. प. हायकोर्टात! 

जळगाव ः भुसंपादीत जमिनीच्या शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी द्यावयाची भरपाई ही शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. परंतु, ती मिळत नसल्याने न्यायालयाने कार्यकारी अभियंता लघुसिंचन यांच्या खात्यातून निधी वर्ग करण्याचे आदेश दिले होते. मात्र तसे न होता जळगाव जिल्हा बॅंकेने परस्पर सीईओ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या खात्यातून 5कोटी 12 लाख निधी वर्ग केला. परस्पर निधी वर्ग केल्याने जिल्हा परिषदेने जिल्हा बॅंक विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याचे सीईओ दिवेकर यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज (ता. 3) अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, उपाध्यक्ष नंदू महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महिला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील यांच्यासह सदस्य मधू काटे, शशिकांत साळुंखे, नानाभाऊ महाजन, प्रताप पाटील, कैलास सरोदे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर आदी उपस्थित होते. जिल्हा बॅंकेतून परस्पर निधी वर्ग करण्यात आल्याचा मुद्दा गेल्या सभेत नानाभाऊ महाजन यांच्याकडून उपस्थित झाला होता. यावेळी 1 कोटी 74 लाख निधी वर्ग झाल्याची माहिती त्यांनी दिली होती. तरी देखील प्रशासनाकडून चौकशी न झाल्याने पाच दिवसांपूर्वी पुन्हा 3 कोटी 38 लाख रुपये निधी वर्ग झाला. तो देखील न्यायालयाच्या आदेशानुसार लघुसिंचनच्या खात्यातून न करता सीईओ व कॅफो यांच्या सहिच्या खात्यातून निधी वर्ग झाल्याचे महाजन यांनी सभागृहात सांगितले. यावरून जिल्हा बॅंकेच्या विरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याचे सीईओ दिवेकर यांनी सभागृहात सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट पाणीपुरवठा विभागातील क्‍लर्क तडवी यांनी टाकली असून, त्यांची चौकशी करून कारवाईची मागणी सदस्यांनी केली. 

बॅंकेला देणार नोटीस 
जिल्हा बॅंकेने सांगितलेल्या खात्यातून निधी वर्ग न करता परस्पर दुसऱ्या खात्यातून निधी वर्ग करण्याचे काम केले. याबाबत जिल्हा बॅंकेला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. तसेच साधारण चाळीस कोटी इतकी रक्‍कम असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे एकत्रित खाते बंद करून ते अन्य बॅंकेत सुरू करण्यात येणार असल्याचे सीईओ दिवेकर यांनी सांगितले. 

एरंडोल- धरणगाव दुष्काळाबाबत ठराव 
जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाला असून, जिल्ह्यातील एरंडोल व धरणगाव तालुका वगळता अन्य तालुक्‍यात दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, एरंडोल आणि धरणगाव तालुका देखील दुष्काळी जाहीर करण्याची मागणी प्रताप पाटील यांनी सभेत केली असून, याबाबतचा ठराव स्थायी समिती सभेत करण्यात आला. 

कागदोपत्री शिबिर 
प्राथमिक आरोग्य केंद्रात दर महिन्याला मानव विकास कल्याण उपक्रमांतर्गत शिबिर लावण्यात येते. परंतु चाळीसगाव तालुक्‍यात एक देखील शिबिर न घेता ते कागदोपत्री दाखवून त्यासाठी मिळणारा पैसा काढून घेतल्याचा प्रकार राष्ट्रवादीचे शशिकांत साळुंखे यांनी सभागृहात सांगितले. यावरून चौकशी करण्याचे आदेश सीईओ दिवेकर यांनी दिले. 

शिक्षकांचे समायोजन करावे 
अंतर जिल्हा बदली संदर्भात शिक्षकांच्या नेमणुका या गैरसोयीने झाल्या आहेत. संवर्ग एक व दोनमधील शिक्षकांचे समायोजन करताना त्यांना सोयीच्या ठिकाणी बदल्या करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर सांगली जिल्हा परिषदेच्या निर्णयाप्रमाणे घेण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. 


सभापती भोळेंचा सभागृहात आत्मक्‍लेष 
जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या भाजपचे गटनेते व शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी अधिकारी ऐकत नाही, फाईलींवर सह्या होत नसल्याने काम होत नाही. पदाधिकाऱ्यांना काही किंमतच नसल्याचे गाऱ्हाणे सभागृहात मांडले. सभापती भोळे यांनी गेल्या पीआरसी समोर देखील हाच मुद्दा उपस्थित केला असताना आज पुन्हा स्थायी समिती सभेत त्यांनी अधिकारी ऐकत नसल्याचा आत्मक्‍लेष केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com