सदस्यांच्या विकासनिधीवरून होणार वादळी चर्चा

सदस्यांच्या विकासनिधीवरून होणार वादळी चर्चा

जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्नांनी प्रत्येकी वीस लाखांचा विकासनिधी मंजूर करून दिला होता. तो जिल्हा परिषदेने समिती सदस्यांना देण्यास नकार दिल्याने सर्वच नवनिर्वाचित सदस्यांची नाराजी आहे. 19 जुलैला होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याच विषयावरून वादळी चर्चा होण्याची चिन्हे आहेत. 

गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीवर निवड झालेल्या सदस्यांनी वेळोवेळी बैठकीत तत्कालीन पालकमंत्री पाटील यांच्यासमोर विकासनिधीचा विषय लावून धरला. यामुळे 27 मेस सुमारे चाळीस सदस्यांना प्रत्येकी वीस लाखांचा विकासनिधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषदेने हा निधी देण्यास नकार दिला आहे. विकासकामांसाठी निधी मंजूर होऊन जिल्हा परिषदेकडे वर्गही झाला. मात्र, जिल्हा परिषद हा निधी सदस्यांना देण्यास नकार देत असल्याने सदस्यांची "गोची' झाली आहे. सदस्यांच्या वाटणीचा वीस लाखांचा विकासनिधी मिळण्यासाठी ते जिल्हा परिषदेत सतत तगादा लावत आहेत. तरीही त्यांना अजून विकासनिधी मिळाला नाही. यामुळे सर्वच सदस्यांनी आता पालकमंत्र्यांकडे दाद मागण्यासाठी नियोजन समितीच्या बैठकीची ते वाट पाहत आहेत. 

नियोजन समितीत 40 सदस्य 
जिल्हा नियोजन समितीत जिल्हा परिषदेतून 27 सदस्य, पालिका क्षेत्रातून 9, महापालिका क्षेत्रातून चार, असे एकूण चाळीस सदस्य निवडून आले आहेत. 

पालकमंत्र्यांची शेवटची सभा 
गिरीश महाजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली 19 जुलैला होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पहिली व विधानसभा निवडणुकीपूर्वी शेवटची असणार आहे. यामुळे या बैठकीत नियोजन समितीच्या सदस्यांचा मंजूर होऊनही न मिळालेला विकासनिधी, जिल्ह्यातील रखडलेली विकासकामे; विशेषतः तरसोद ते फागणे महामार्गाचे चौपदरीकरण, जळगाव ते औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरण, जळगाव शहरातील रखडलेले अमृत योजनेचे काम, त्यामुळे खड्डे तयार होऊन होणारे अपघात आदी विषयांवर वादळी चर्चा होईल. 

निमंत्रित सदस्यांना निधी नाही 
जिल्हा नियोजन समितीवर नुकतीच 14 सदस्यांची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यांना विकासनिधी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com