जिल्हा बॅंक पीककर्ज वाटपात 200 कोटींचा घोळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

जळगाव : जिल्हा बॅंकेतर्फे 2013- 14 मध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात तब्बल 200 कोटींचा घोळ झाल्याची गंभीर बाब बॅंकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणातून उघड झाली आहे. दरम्यान, यातील काही कर्ज वसूल झाले असून, उर्वरित वसुलीसाठी संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात येणार आहे. या विषयावर आज बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. 

जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण सभा चेअरमन ऍड. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष किशोर पाटील, एकनाथ खडसे आदी संचालक उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व बॅंकेचे संचालक वाडिलाल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अजेंड्यावरील विषयावर चर्चा करण्यात आली. 

लेखापरीक्षणातून घोळ उघड 
जिल्हा बॅंकेतर्फे 2013-14 मध्ये वाटप करण्यात आलेल्या पीककर्जात काही शेतकऱ्यांनी एका उताऱ्यावर तेवढ्याच क्षेत्रावर दोन-तीन पिकांचा उल्लेख दाखवून दुहेरी कर्ज उकळले आहे. बोगस नोंदी सादर करून हे कर्ज घेतल्याने बॅंकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणात ही बाब उघड झाली. सीए शेखर सोनाळकर यांनी हे लेखापरीक्षण केले आहे. मात्र, त्यांना त्यासाठी सोसायट्यांकडून दप्तरही उपलब्ध झाले नसल्याचेही बोलले जात आहे. 
 
काहींनी कर्ज भरले 
सुमारे 200 कोटींच्या कर्जवाटपात अनियमितता आढळून आल्याचे दिसत असून, त्यापैकी काही शेतकऱ्यांनी रकमा भरल्या आहेत. उर्वरित कर्जवसुलीसाठी संबंधित सोसायट्या व शेतकऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात येईल. त्यावरही जे भरणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी ठरावासाठी संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात येणार आहे. कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सभेच्या अजेंड्याचे वाचन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jilha bank 200 cr