जिल्हा बॅंकेत शेतकरीपुत्राचा विष प्राशनाचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जळगाव : एरंडोल तालुक्‍यातील शेतकऱ्याने घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेतील पाच हजार रुपये गेल्या दीड वर्षापासून मिळत नसल्याने शेतकरीपुत्राने आज साडेतीनच्या सुमारास जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत विष प्राशनाचा प्रयत्न केला. बॅंक अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने तरुणाने हाती विषाची बाटली घेतली. बॅंकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्वरित त्यावर झडप घालत ती बाटली ताब्यात घेत तरुणास पोलिसांच्या स्वाधीन केले. 

जळगाव : एरंडोल तालुक्‍यातील शेतकऱ्याने घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेतील पाच हजार रुपये गेल्या दीड वर्षापासून मिळत नसल्याने शेतकरीपुत्राने आज साडेतीनच्या सुमारास जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत विष प्राशनाचा प्रयत्न केला. बॅंक अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने तरुणाने हाती विषाची बाटली घेतली. बॅंकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्वरित त्यावर झडप घालत ती बाटली ताब्यात घेत तरुणास पोलिसांच्या स्वाधीन केले. 

जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर, मनोज मन्साराम महाजन (वय 30, रा. एरंडोल) याने रडतच कैफियत मांडली. जिल्हा सहकारी बॅंकेच्या एरंडोल शाखेतून दीड वर्षापूर्वी 69 हजार रुपयांचे पीककर्ज मंजूर झाले होते. बॅंकेच्या पीककर्ज खात्याच्या एटीएम कार्डद्वारे (किसान कार्ड) महाजन यांनी पैसे काढल्यावर त्यांना 64 हजार रुपयेच काढता आले. बॅंकेने 69 रुपयांचे कर्ज मंजूर केले असताना पाच हजार रुपये कमीची रक्कम मिळाल्याने त्याने एरंडोल शाखेत संपर्क करून तक्रार केली. तेथून त्याला जळगावच्या मुख्य शाखेत संपर्क करण्यास सांगण्यात आले. 

दीड वर्षापासून पाठपुरावा 
दीड वर्षापासून मनोज महाजन वेळ मिळेल तेव्हा बॅंकेत येऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारी करीत होता. त्याची कागदपत्रे जमा करून आश्‍वासन देत त्याला नेहमी रवाना करण्यात येत होते. आज मनोज व त्याचा चुलत भाऊ महेंद्र माधव महाजन दोघेही बॅंकेच्या मुख्य शाखेत आले. संबंधित पीककर्ज विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद होऊन त्यांनी पिटाळून लावण्याचा प्रयत्न केल्याने संतापात मनोजने सोबत आणलेल्या तणनाशकाची बाटली काढून तोंडाला लावल्याने एकच गोंधळ उडाला. 

थोडक्‍यात टळला अनर्थ 
जवळपास उभ्या इतरांनी मनोजच्या हातातून विषाची बाटली हिसकावून पोलिसांना खबर दिल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मनोजला ताब्यात घेण्यात येऊन चौकशी सुरू होती. बॅंकेतर्फे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
बहुतांश शेतकऱ्यांच्या तक्रारी 
एरंडोल तालुक्‍यासह जवळपासच्या तब्बल 1 हजार 300 शेतकऱ्यांच्या पीककर्ज खात्यातून पाच हजार वगळताच रक्कम मिळाली होती. त्यापैकी गेल्या वर्षभरात केवळ पाचशे शेतकऱ्यांना वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर ही रक्कम मिळू शकली. तर एरंडोलच्या पीककर्ज घेतलेल्या जवळपास 400 शेतकऱ्यांना पाच हजार वगळूनच पिककर्जाची रक्कम मिळाल्याचे मनोज महाजन यांनी सांगितले. 

शेतीकामे सोडून आलोय 
माझ्याकडे सहा बिघे शेती आहे, सातवी पर्यंत शिक्षण झालंय शेतात कामाची घाई गरबड सुरू असताना पैसे मिळतील या अपेक्षेने आलो होतो. येण्याजाण्यासाठी दोनशे रुपये खर्च होतात. कामाचा दिवस वाया जातो, विनवण्या करूनही अधिकारी पिटाळून लावतात. मग, करणार तरी काय? 
- मनोज महाजन 
 

Web Title: marathi news jalgaon jilha bank farmer