गायीच्या दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

जळगाव : जिल्ह्यात गायीच्या दूध खरेदीसाठी दोन रुपये प्रतिलिटर भाववाढ देण्याचा निर्णय जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ संचालक चिमणराव पाटील यांनी दिली. 

जळगाव : जिल्ह्यात गायीच्या दूध खरेदीसाठी दोन रुपये प्रतिलिटर भाववाढ देण्याचा निर्णय जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ संचालक चिमणराव पाटील यांनी दिली. 

जिल्हा दुध संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज झाली. ज्येष्ठ संचालक चिमणराव पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दूध उत्पादक शेतकरीदेखील या संकटाचा सामना करीत आहेत. दुधाला भाववाढ मिळावी, अशी मागणी दूध उत्पादकांची होती. या मागणीवर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अध्यक्षा मंदाताई खडसे आणि संचालक मंडळासोबत झालेल्या चर्चेनुसार गायीच्या दूध खरेदीला दोन रुपये प्रतिलिटर वाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे ज्येष्ठ संचालक पाटील यांनी सांगितले. 
-------- 
सद्यःस्थितीत 25 रुपये प्रतिलिटरप्रमाणे दूध खरेदी होत आहे. एक ऑगस्टपासून त्यात दोन रुपयांनी वाढ होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बैठकीत 40 विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला संचालक उदय वाघ, प्रमोद पाटील, ऍड. ब्रह्मे, ए. डी. पाटील, श्‍यामल झांबरे, पूनम पाटील, सुनीता पाटील, डॉ. संजीव पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्या पायाला फ्रॅक्‍चर असल्याने ही बैठक चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jilha dudha sangh cow milk 2 rupese