जि. प. कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी "ऍप' 

जि. प. कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी "ऍप' 

जळगाव ः जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या हजेरीबाबत बंद पडलेली "व्हॉटस्‌ऍप' प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीपेक्षा एक पाऊल पुढे म्हणून अद्ययावत अशा सर्व प्रणालींनी उपलब्ध असलेले "ऍप' तयार करण्यात येणार आहे. ही प्रणाली शिक्षकांसमवेत ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांसाठी ठेवणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी सांगितले. 
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारणा आणि पटसंख्यावाढीच्या दृष्टीने शिक्षक हजेरीसाठी तत्कालीन सीईओ पांडेय यांनी "स्ट्रॉम' ही व्हॉटस्‌ऍप प्रणाली सुरू केली होती. या प्रणालीला पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम सीईओ पाटील यांनी केले आहे. याची सुरवात आजपासून करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे छायाचित्र टाकण्यास शिक्षकांचा विरोध होता. यात सुधारणा करून प्रत्यक्ष छायाचित्र न टाकता हजेरी मस्टरचे छायाचित्र सकाळ आणि सायंकाळ टाकण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या प्रणालीपेक्षा अपडेट असलेले जिल्हा परिषदेचे स्वतंत्र "ऍप' कार्यान्वित करून त्या जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना जोडण्यात येणार असल्याचे "सीईओ' पाटील यांनी सांगितले. 
 
माहिती टाकणे होणार सोपे 
जिल्हा परिषदेचे स्वतंत्र ऍप तयार करण्यात येणार आहे. हे सर्व कर्मचाऱ्यांसाठी राहणार असून, यात कर्मचाऱ्याची संपूर्ण माहितीसह त्याच्याशी संबंधित असलेल्या कामाची माहिती या ऍपच्या माध्यमातून टाकणे शक्‍य होणार आहे. मुख्य म्हणजे कर्मचारी कामावर हजर आहे किंवा नाही, याची नोंद या ऍपच्या माध्यमातून थेट सीईओ व विभागप्रमुख यांच्यापर्यंत आहे. शिवाय या ऍपच्या माध्यमातून काही माहिती बसल्या ठिकाणाहून टाकणे, सुटी टाकणे यासारखे पर्याय राहणार आहेत. अर्थात जिओ टॅगिंगप्रमाणे या ऍप प्रणालीचे काम राहणार आहे. 
 
कर्मचाऱ्यांसाठी तक्रार निवारण सभा 
जिल्हा परिषदेत विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या किंवा तक्रारी असतात. या तक्रारी सीईओंपर्यंत थेट पोहोचत नाही. त्या बऱ्याचवेळा विभागप्रमुखांपर्यंत येऊन थांबलेल्या असतात. अशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी पंधरा दिवसांतून कर्मचाऱ्यांसाठी तक्रार निवारण सभा घेण्यात येणार असल्याचे "सीईओ' पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com