जिल्हा परिषदेची सूत्रे भाजप जिल्हाध्यक्षांच्या हाती

जिल्हा परिषदेची सूत्रे भाजप जिल्हाध्यक्षांच्या हाती

जळगाव ः समान निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत घमासान निर्माण होऊन सत्ताधाऱ्यांमध्येच गट-तट निर्माण झाले आहेत. हे वाद मिटविण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांनी मध्यस्थी केली. परंतु आता जिल्हा परिषदेची सूत्रेच भाजप जिल्हाध्यक्षांनी हाती घेतले आहेत. कारण कामांचे नियोजनापासून तर आता विशेष सभा बोलाविण्याची तारीख देखील वाघ यांच्याकडून निश्‍चित करण्यात आल्याचे समजत आहे. 

जिल्हा परिषदेत गटातटाचे राजकारण गेल्या दीड वर्षापासून उद्‌भवत आहे. अर्थात जिल्हा परिषदेच्या सत्तेतील असलेल्या भाजपमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे असे दोन गट अगदी सुरवातीपासून निर्माण झाले आहेत. यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असला तरी गटातटाचे राजकारण उघड होत आहे. यात बुधवारी (ता. 28) झालेल्या सर्वसाधारण सभेत समान निधी वाटपाच्या मुद्यावरून विरोधकच नव्हे, तर सत्ताधारी गटातील सदस्यांनी देखील जोरदार विरोध दर्शविला. यामुळे विषय नामंजूर करण्याची नामुष्की ओढवली. ही नामुष्की भाजपच्या पदाधिकाऱ्यांची पचनी न पडणारी आहे. हा वाद मिटविण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी मध्यस्थी केली. आता जिल्हा परिषदेचे सूत्रेच हाती घेतले आहेत. 

पदाधिकारी उरले नामधारी 
जिल्हा परिषदेतून होणाऱ्या विकास कामांच्या नियोजनासाठी गतवर्षी देखील उशीर झाला होता. अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे झाले. तीच स्थिती यावर्षी देखील निर्माण झाली. नियोजनाला विलंब झाल्याने जालसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत पदाधिकारी यांच्यात समन्वय घडवून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर नियोजन करण्यात आले. पण पदाधिकाऱ्यांनी स्वतः जास्त निधी घेऊन सदस्यांना कमी निधी दिला. यावरून समान निधी वाटपावरून वाद निर्माण झाला. यात आता भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी मध्यस्थी करत सर्वांना समान निधी देण्याचे ठरविण्यात आले. हे करण्यासोबतच जिल्हा परिषदेची सूत्रेच हाती घेतली. अर्थात विकास कामांचे नियोजन करून देण्यापासून तर आता सभांची तारीख ठरविण्यापर्यंतचे निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना नाही, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ ठरवत आहेत. 
.............. 
विशेष सभा 10 डिसेंबरला 
समान निधी वाटपाच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत गदारोळ निर्माण झाला होता. यामुळे विषय बहुमताने नामंजूर करण्यात आला होता. यानंतर जिल्हाध्यक्ष वाघ यांनी मध्यस्थी करत वाद मिटवत समान निधी देण्याचे निश्‍चित केले. यामुळे नामंजूर करण्यात आलेल्या विषयांना मंजुरी घेण्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात येत आहे. ही विशेष सभा वाघ यांच्या दिलेल्या तारखेनुसार म्हणजे 10 डिसेंबरला घेण्याचे ठरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com