अध्यक्षांच्या "पीआरओं'नी घातला मुख्य लेखा अधिकाऱ्याशी वाद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील कामकाजाबाबत माहिती घेण्यासाठी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान ग्रामसेवक असलेले व सध्या अध्यक्षांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम सांभाळत असलेल्या पुलकेशी केदारे यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांच्याशी एकेरी भाषेत बोलत वाद घातल्याचा प्रकार घडला. या विरोधात जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्यावतीने आज कामबंद आंदोलन करण्यात आले असून, सीईओ शिवाजी दिवेकर यांच्याकडे केदारे यांची तक्रार निवेदनाद्वारे दिली. 

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष रवींद्र मराठे, उपाध्यक्ष संजय पाटील यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, की अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी बुधवारी (4 जुलै) विभागाला भेट देऊन निधी खर्चाच्या माहिती संदर्भातील नोंदवह्या, रोखवह्या व अखर्चित रक्‍कम या संदर्भात माहिती विचारली. शिवाय वार्षिक नियोजन 2017-18 व 2018-19 ची माहिती मागितली. परंतु, सदर माहिती अर्थ विभागाकडे नसून संबंधित खातेप्रमुखांकडेच मिळेल, असे सांगितले. यावर अध्यक्षांनी 2018-19 च्या नियोजनासंबंधीची माहिती जनसंपर्क अधिकारी केदारे हे सांगतील तशी देण्याबाबत सूचना केली. यावेळी केदारे यांनी "कॅफो' महाजन यांना एकेरी भाषेत बोलून अपमानीत केले. तसेच अर्थ विभागातील दोन वर्षाची माहिती असून सर्व माहिती बाहेर काढत असल्याचे उच्चभाषेत बोलले. हा प्रकार विभागातील कर्मचाऱ्यांसमवेत घडला असून, या विरोधात कर्मचाऱ्यांनी आवाज उठवत आज कामबंद आंदोलन पुकारले. तसेच केदारे हे वर्ग 3 कर्मचारी असून, त्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी या वर्ग 1 पदावर असलेल्या अधिकाऱ्याशी एकेरी भाषेत बोलण्याचा निषेध केला असून, केदारे यांच्याबाबतची तक्रार संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे. 

अनेकवेळा माहिती मागूनही मिळत नसल्याने आणि विभागाच्या तक्रारी असल्याने अर्थ विभागाला भेट दिली. यावेळी माझ्या सूचनेनुसार माझ्या सहकाऱ्यांनी अपेक्षित माहिती का दिली जात नाही, याबाबत जाब विचारला. माहिती विचारण्याचा राग "कॅफों'ना आल्याने त्यांनी केदारे यांना एकेरी भाषेत बोलून माहिती देण्यास टाळाटाळ केली. 
- उज्ज्वला पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद जळगाव 

"अध्यक्षांनी विभागाला भेट देवून माहिती घेत असताना त्यांचे पीआरओ असलेले केदारे यांनी उच्चभाषेत बोलण्यास सुरवात केली. त्यांना केवळ अध्यक्ष जे विचारतील ते सांगेन तुम्ही खाली बसा असे सांगितल्यावरून उच्च आवाजात बोलण्यास सुरवात केली होती.' 
- नरेंद्र महाजन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद. 
 
Web Title: marathi news jalgaon jilha parishad president pro caffo