विशेष सभेत सभात्याग करत विरोधकांची घोषणाबाजी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

जळगाव ः समान निधी वाटपाच्या मुद्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटातील सदस्यांचा विरोध झाल्याने प्रचंड गदारोळ झाला होता. यामुळे 120 कोटी रूपयांच्या खर्चाचे नियोजन फिस्कटले होते. यास मंजूरी घेण्यासाठी आज विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सभेत सत्ताधाऱ्यांनी अवघ्या पाच मिनिटात 120 कोटीच्या नियोजनास बहुमताने मंजूरी दिली. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग करत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. 

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे उपस्थित होते. सभेला सुरवात झाल्यावर विषय सुचीतील पहिला विषय वाचल्यानंतर त्यास भाजप गटातून मंजूरी दर्शविण्यात आली. याचवेळी विरोधी पक्षातील शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे यांच्यासह सर्वच सदस्यांनी मागील सभेचे इतिवृत्त सभेत का ठेवण्यात आले नाही? असा प्रश्‍न उपस्थित करत समान निधी वाटपासंदर्भात सर्व सदस्यांना स्पष्टीकरण करण्याची मागणी केली. मात्र अध्यक्ष उज्वला पाटील व उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी विषय सुचीतील एक ते बारा विषय मंजूर करण्याची घोषणा केली. याला भाजपच्या सदस्यांनी होकार दर्शविला असता, विरोधकांनी मात्र सभात्याग करण्याचा निर्णय घेत घोषणाबाजी करत सभागृह सोडले. 

जि.प.समोर ठिय्या 
शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ जावून ठिय्या आंदोलन केले. येथे आवाज कुणाचा..., शिवाजी महाराज की जय...सत्ताधारी भाजप पक्षाचा निषेध असो...अशी प्रचंड घोषणाबाजी केली. शिवाय, जिल्हा परिषदेत बेकायदेशीपणे काम सुरू असून सर्वांना समान निधी वाटपाची मागणी कायम असल्याचे सांगितले. याबाबत विभागीय आयुक्‍तांकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील व राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे यांनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon jilha parishad sabha shivsena sabhtyag