सिंचन विहिरीच्या कार्यारंभ आदेशासाठी "बीडीओं'कडून 50 हजारांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

जळगाव ः सिंचन विहीर मंजूर झाल्यानंतर त्यास पंचायत समिती स्तरावरून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु, एक वर्षापासून विहिरीच्या कार्यारंभासाठी पाठपुरावा सुरू असताना जामनेर पंचायत समितीला नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी जोशी यांनी 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रारी भारूडखेडा येथील शेतकऱ्याकडून झाली आहे. याबाबत आजच्या जलव्यवस्थापन समिती सभेत लालचंद पाटील यांनी मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. 

जळगाव ः सिंचन विहीर मंजूर झाल्यानंतर त्यास पंचायत समिती स्तरावरून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु, एक वर्षापासून विहिरीच्या कार्यारंभासाठी पाठपुरावा सुरू असताना जामनेर पंचायत समितीला नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी जोशी यांनी 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रारी भारूडखेडा येथील शेतकऱ्याकडून झाली आहे. याबाबत आजच्या जलव्यवस्थापन समिती सभेत लालचंद पाटील यांनी मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. 
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा आज अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, सदस्य लालचंद पाटील, मीना पाटील, पवन सोनवणे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर आदी उपस्थित होते. 
भारूडखेडा (ता. जामनेर) येथील शेतकरी भगतसिंग पाटील यांनी सिंचन विहिरीसाठी ग्रामसभेमार्फत 2016 मध्ये पंचायत समिती जामनेर यांच्याकडे अर्ज केला होता. त्यास मंजुरी मिळून 17 मे 2017 मध्ये पंचायत समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तरी देखील गेल्या एक वर्षापासून कार्यारंभ आदेश देण्यात आले नाही. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पंचायत समिती जामनेर येथे नव्याने रुजू झालेले बीडीओ ए. बी. जोशी यांनी पैशांची मागणीसाठी कार्यारंभ आदेश देण्यास नकार दिल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात सदस्य लालचंद पाटील यांनी सभेत प्रश्‍न उपस्थित करीत गटविकास अधिकारी जोशी यांची चौकशी करण्याची मागणी केली. यावर अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी मस्कर यांनी या प्रकरणी बीडीओंना उद्या (30 जून) बोलावून यासंदर्भात विचारणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. या व्यतिरिक्‍त जिल्ह्यात सिंचन विभागामार्फत झालेल्या जलयुक्‍त शिवाराचा आढावा घेतला असताना, ज्या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला आहे; तेथे पहिल्या पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. 
 
आत्मदहनाचा इशारा 
शेतकऱ्याकडून करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की प्रत्यक्ष भेटीमध्ये गटविकास अधिकारी यांनी आतापर्यंत कोणती विहीर फुकट मिळाली, सर्वांनी पैसे दिले तर तुम्ही का देत नाही, असे सांगत असतात. मी असेपर्यंत तुमची विहीर होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांकडे काय मंत्र्याकडे तक्रार करा, असा दम देत विहिरीबाबत "सीईओं'च्या आदेशाची फाइल फेकून दिल्याचे भरतसिंग पाटील यांनी म्हटले आहे. बीडीओंसह पंचायत समितीमधील यंत्रणेने तालुक्‍यातील अन्य शेतकऱ्याकडून देखील पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास पंचायत समितीत त्यांच्याच दालनाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

Web Title: marathi news jalgaon jilha parishad sinchan vihir jamner