शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेत शाळा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बिकट असून, विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने ती वाढविण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. परंतू शाळेत विद्यार्थी आहे; मात्र त्यांना शिकवायला शिक्षकच नाही. हा प्रकार ढालगाव (ता. जामनेर) येथील जि.प. उर्दू शाळेतील आहे. यामुळे शिकविण्यासाठी शिक्षक द्या; या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी थेट जिल्हा परिषद गाठत मुख्य प्रशासकिय इमारतीच्या आवारातच शाळा भरविली. 

जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील ढालगाव (ता. जामनेर) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची ही व्यथा आहे. पहिली ते आठवीपर्यंतची शाळा असून एकूण 185 पटसंख्या आहे. तरी देखील या शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे शाळेतील तीनही शिक्षकांची बदली नुकताच झालेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत करण्यात आली आहे. त्याऐवजी नियुक्‍ती देण्यात आलेले दोन्ही शिक्षक अद्याप शाळेवर रूजू झाले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याने शालेय समिती व पालकांनी आज (ता.4) विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा आणला. साधारण बारा वाजेच्या सुमारास विद्यार्थी जि.प.मध्ये आल्यानंतर नवीन इमारतीच्या आवारात रांगेत बसवून शाळा भरविल्याचा प्रकार घडला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष इकबाल तडवी, सलीम तडवी, खैरूद्दीन तडवी, खलील गुलशर तडवी, सादीक तडवी यांच्यासह पालक उपस्थित होते. 
ढालगाव येथील जि.प. उर्दू शाळेतील तीन शिक्षकांची बदली झाल्याने त्यांच्याऐवजी दोन शिक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली होती. परंतू हे शिक्षक हजर झालेले नाही. शिक्षक नसल्याने विद्यार्थी जि.प.मध्ये आल्याने नियुक्‍ती करण्यात आलेले शिक्षक आज सायंकाळपर्यंत हजर न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सांगितले. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. देवांग यांनी शाळेत तीन शिक्षकांची तात्पुरती नियुक्‍ती करण्याबाबत जामनेर गटशिक्षणाधिकारी यांना पत्र दिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jilha parishad urdu school Dhalgaon student zp morcha