जि. प. विशेष सभा बोलावून केली रद्द ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जळगाव ः आर्थिक विषयांवर निर्णय घेऊन त्यास मंजुरी घेण्याकरिता जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार सभा घेण्याचे नियोजन 23 ऑगस्टला झाले असताना सभा अचानक रद्द करण्यात आल्याचा प्रकार झाला. यात अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही प्रक्रिया होत असून, अध्यक्षांकडून नकार आल्याने सभा रद्द करावी लागल्याचे बोलले जात आहे. 

जळगाव ः आर्थिक विषयांवर निर्णय घेऊन त्यास मंजुरी घेण्याकरिता जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार सभा घेण्याचे नियोजन 23 ऑगस्टला झाले असताना सभा अचानक रद्द करण्यात आल्याचा प्रकार झाला. यात अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही प्रक्रिया होत असून, अध्यक्षांकडून नकार आल्याने सभा रद्द करावी लागल्याचे बोलले जात आहे. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 25 जुलैला घेण्यात आली होती. या सभेत आयत्या वेळेच्या विषयात आर्थिक विषय टाकण्यात आल्याने विरोधकांनी यावर हरकत घेत विषय मंजूर होऊ शकले नाही. या आर्थिक विषयांच्या ंमंजुरीकरिता विशेष सभा घेण्याचे नियोजन सुरू झाले होते. याबाबत उपाध्यक्ष तसेच सभापतींनी चर्चा केली. मात्र अध्यक्ष हे बाहेरगावी असल्याने दूरध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधून अध्यक्षांनी सभा बोलाविण्यास सहमती दर्शवली. या तोंडी सहमतीवरून उपाध्यक्षांनी सामान्य प्रशासन विभागास विशेष सभा 23 ऑगस्टला घेण्याच्या अनुषंगाने आर्थिक विषयांची यादी तयार करण्याबाबतचे पत्र सर्व खाते प्रमुखांना काढले. 
यानुसार विशेष सभा 23 ऑगस्ट बोलविण्यात येत असून आपल्या विभागाच्या कामांच्या याद्या, नियोजन सादर करावे, याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी सर्व खाते प्रमुखांना दिले. परंतु, अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्याकडून सभा घेण्यास नकार देण्यात आल्याने सभा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे यांनी सांगितले, की हे पत्र सभेसंदर्भात नसून, विषय काढण्यासाठीचे आहे. अध्यक्षांच्या पत्राशिवाय सभा घेता येत नसल्याचे अकलाडे यांनी सांगितले. परंतु, अध्यक्षांना अधिकार असताना उपाध्यक्षांच्या सहमतीने पत्र कसे काढले गेले; याबाबत मात्र चर्चा सुरू होती. 

सभा व्हावी अशी आपली इच्छा आहे. त्यानुसार सभा घेण्याबाबत सभापती पोपट भोळे यांनी फोनवरून विचारले असता 23 ऑगस्टला सभा घेण्याबाबत होकार दिला. मात्र, सभा रद्द केल्याबाबत माझ्यापर्यंत माहिती आलेली नाही. 
- उज्ज्वला पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद जळगाव.

Web Title: marathi news jalgaon jilha parishad vishesh sabha