खानदेशात कानबाईमातेच्या रोटची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

गणपूर (ता. चोपडा) : श्रावणातील नागपंचमीनंतरच्या पहिल्या शनिवारी व रविवारी कानबाईमाता किंवा कानुबाईचा रोट हा उत्सव खानदेशात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. यंदा हा उत्सव 18 व 19 ऑगस्टला खानदेशात सर्वत्र होतोय. 

गणपूर (ता. चोपडा) : श्रावणातील नागपंचमीनंतरच्या पहिल्या शनिवारी व रविवारी कानबाईमाता किंवा कानुबाईचा रोट हा उत्सव खानदेशात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. यंदा हा उत्सव 18 व 19 ऑगस्टला खानदेशात सर्वत्र होतोय. 

कानबाईमाता उत्सवाला खूप जुनी परंपरा लाभली आहे. त्यासाठी मुहूर्त पाहत नाही. नागपंचमीनंतरच्या येणाऱ्या शनिवारी व रविवारी रोट होतात. चाळीसगावजवळ उमरखेड येथे कानबाईचं मंदिर आहे. ज्यांना नवीनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेऊन तेथील मूर्तीला स्पर्श करून आणतात. 
तर असे हे परतून आणलेले नारळ त्या दिवशी धुवून घेतात त्यालाच नथ, डोळे बसवून इतरही पारंपरिक दागिने घालतात. केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेवून तिची स्थापना होते. कलशावरूनच गळ्यातील हार, मणी मंगळसूत्र चढवले जाते. वरून शेवंतीची वेणी लावून ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज कणकेचाच केला जातो. आमटी, भाजी, काशाच्या ताटात ठेवून देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच येथेही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. अलीकडे भजन, कीर्तनही केले जाते. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघते. 
..... 
रोटसाठी कुटुंबातील येतात एकत्र 
खानदेशात गेली अनेक दशके ही परंपरा सुरू आहे. रोटसाठी घरातील व कुटुंबातील सर्व जण एकत्र येतात. नोकरदार किंवा बाहेरगावी कामानिमित्त गेलेलेही घरी येतात. या सणामुळे कुटुंबातील वाद, कुरबूर आणि अबोला मिटल्याचे जाणकार सांगतात.

Web Title: marathi news jalgaon kanbai utsav khandesh