"पु.ल.', "गदिमा', "बाबुजीं'सारख्यांमुळे महाराष्ट्र मोठा : ना. धों. महानोर 

"पु.ल.', "गदिमा', "बाबुजीं'सारख्यांमुळे महाराष्ट्र मोठा : ना. धों. महानोर 

जळगाव : एखाद्या गावाची, राज्याची ओळख, उंची ही ते किती मोठे आहे, किती समृद्ध आहे, यापेक्षा त्याठिकाणी किती प्रतिभावंत कवी, साहित्यिक, कलावंत आहेत, त्यातून होते. त्यामुळे पु.ल., गदिमा, बाबुजींसारख्या प्रतिभावंतांमुळेच महाराष्ट्र मोठा आहे, त्याची उंची अधिक आहे, असे प्रतिपादन कविवर्य ना.धों. महानोर यांनी केले. 
विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित "पुलोत्सवा'त गुरुवारी सायंकाळी महानोरांनी प्रकट मुलाखतीतून या तिघा महनीयांसोबतच्या स्मृतींना उजाळा दिला. प्राथमिक शिक्षणापासून शेतकरी, नंतर कवी म्हणून ओळख आणि पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर, सुधीर फडके अर्थात बाबुजी यांच्यासोबतच्या सहवासाचे प्रसंग सांगत महानोरांनी आपला जीवनपट उलगडला. 
"पुल', "गदिमा', "बाबुजीं'सारखे साहित्यिक, कलावंत होऊन गेले. अनेक नावे घेता येतील, त्यांच्यामुळेच महाराष्ट्र मोठा झाला आणि आजही आहे. या तिघांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बरेच काही बोलण्यासारखे आहे, त्यांच्या आठवणी सांगायला ही सायंकाळही अपुरी पडेल. या तिघांनी महाराष्ट्राला खूप काही दिलं.. ते दीर्घकाळ टिकणारं आणि नदीसारखं जीवनाला प्रवाह देणारं आहे.. या मोठ्या लोकांनी माझ्यासारख्या अनेक लहानांना कवेत घेतले, ओटीपोटी खेळविले... त्यातून त्यांच्याकडून काही शिकलो आणि ते या समाजाला देऊ शकलो, असे महानोर म्हणाले. 

विचारसरणी भिन्न, तरीही एकरूप 
"गदिमा' कॉंग्रेसच्या विचारसरणीचे. त्यांच्यात कॉंग्रेस भिनलेली. बाबुजी सुरवातीपासून संघाचे, कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. तर देव मूर्तीत नाही माणसांत आहे, असं मानणारे "पु.ल.' निव्वळ पुरोगामी. तिघांची वैचारिक बैठक वेगळी, तरीही त्यांची साहित्यिक व कलेविषयीची बैठक एक झाली, आणि त्यांना एकरुप करून गेली. आज आपण वेगवेगळ्या विचारांचे झेंडे घेऊन फिरतो, आणि जिवावरही उठतो. या पिढीने त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, अशी अपेक्षा महानोरांनी व्यक्त केली. 
 
महाराष्ट्राला रानात नेलं.. 
महानोरांच्या मुलाखतीतून अनेक आठवणी समोर आल्या. "पुल', "गदिमा', "बाबुजीं'सह मर्ढेकर, बा.भ. बोरकर, सुनीताताई, शांता शेळके, विजय तेंडुलकर अशी अनेक नावे घेता येतील.. साऱ्या महाराष्ट्रालाच मी काट्या-झुडपांच्या रस्त्यांना रानात नेलं.. ते तेथे रमले, माझं शेत, माळरान अन्‌ कविताही त्यांनी रानातच अनुभवल्या. मी मोठा झालो, हे या लोकांच्या मोठेपणामुळे. हे सांगताना महानोरांनी मोसंबीतल्या मळ्यात माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री रंगलेल्या काव्यमैफलीची रम्य आठवणही सांगितली. 
 
शेतीवरील पुस्तकांचे समाधान 
काव्यसंग्रह आणि अन्य अशी अनेक पुस्तके लिहिली. पण त्या पंधरा- वीस पुस्तकांपेक्षा "शेतीसाठी पाणी' व शेतकरी आत्महत्यांबाबत लिहिलेल्या पुस्तकाचे मला जास्त समाधान आहे, असेही महानोर भावूक होऊन म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com