मसाल्याच्या पदार्थांवर दरवाढीचे संकट, केरळमधील पुराचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

जळगाव : प्रत्येक चटपटीत पदार्थ तयार करताना त्यात मसाला हा घटक आवर्जून वापरला जातो. या मसाल्यातील सुमारे 6 ते 7 पदार्थांचे उत्पादन हे केरळमध्ये होते. मात्र, केरळमधील महापुरानंतर सर्व शेती नष्ट झाल्याने ही आयात बंद झाली आहे. परिणामी, मसाला बाजारपेठेत कोटींची उलाढाल जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. 

जळगाव : प्रत्येक चटपटीत पदार्थ तयार करताना त्यात मसाला हा घटक आवर्जून वापरला जातो. या मसाल्यातील सुमारे 6 ते 7 पदार्थांचे उत्पादन हे केरळमध्ये होते. मात्र, केरळमधील महापुरानंतर सर्व शेती नष्ट झाल्याने ही आयात बंद झाली आहे. परिणामी, मसाला बाजारपेठेत कोटींची उलाढाल जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. 
मसाला हा असा पदार्थ आहे जो केवळ आपल्या घरातच नाही तर देशातील प्रत्येक किचनमध्ये दररोज वापरला जातो. मसाल्याशिवाय कोणतेही जेवण तयार करता येत नाही. त्यामुळे मसाल्याची मागणी ही सर्वाधिक असते. या मसाल्यात दहा ते बारा पदार्थांचा वापर केला जातो. या प्रत्येकाचे उत्पादन हे वेगवेगळ्या पद्धतीने केले जात असते. मात्र केरळमध्ये सुमारे 6 ते 7 पदार्थांचे उत्पादन होत असल्याने मसाल्यांसाठी केरळची एक वेगळी ओळख आहे. गेल्या महिन्याभरापासून केरळमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसाने व महापुराने भीषण आपत्ती आली आहे. त्यामुळे ही उत्पादने व पिके पुरात वाहून गेली आहे. 
 
आवक कमी दर अधिक 
केरळला पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागेल त्यानंतर त्याठिकाणी पुन्हा मसाल्याचे उत्पादन होईल. मात्र हे उत्पादन नेहमीपेक्षा कमीच होईल. त्यामुळे भाववाढ होईल. तसेच येत्या काळात परदेशातून याची आयात करावी लागणार असल्याने त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे मसाला उत्पादनाला महापुराचा सर्वाधिक फटका बसल्याने महागाईचा सामना हा करावाच लागणार आहे. 
 
5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढ 
या महापुरामुळे आवक कमी होऊन मसाल्याने दर हे नियमित दरापेक्षा 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढतील. यात प्रामुख्याने हळद, लवंग, वेलदोडे, बाजा, तेजपान, जायफळ, दालचिनी व मिरे या पदार्थांचा समावेश आहे. याचे उत्पादन हे केरळमध्ये होते. 
 
जिल्ह्यात केरळमधून दरमहिन्याला कोट्यवधी रुपयांच्या मसाल्यांची आवक होत असते. मात्र, महापुरामुळे ही आवक कमी होऊन भाववाढ होईल. सध्या जरी परिणाम जाणवत नसला तरी महिनाभरात तो जाणवायला लागेल. 
- प्रवीण पगारिया (व्यापारी) 

शहरातील आकडेवारी अशी 
मालाचे होलसेल व्यापारी : 10 
किरकोळ व्यापारी : 200 वर 
उत्पादने : 7 प्रकारची 
नियमित दरमहा उलाढाल : 5 ते 10 कोटी 

Web Title: marathi news jalgaon kerala pur sankat masala rate