शिंदीच्या काड्यांना "देवरुपी' केरसुणीचा आकार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

जळगाव : घरातल्या केरसुणीची जागा लांबलचक झाडून घेतली.. मात्र, लक्ष्मीपूजनाला केरसुणीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.. ग्रामीण भागात आजही केरसुणीने घर झाडले जात असले तरी "वायफाय'च्या जमान्यातील शहरांमध्ये मात्र या केरसुणीने देव्हाऱ्यात जागा मिळवलीय.. देव्हाऱ्यात ठेवून पूजता येईल, अशी चिमुकली केरसुणी करण्याची कलाकुसरही एका निराधार महिलेने आत्मसात केली असून, तिची ही केरसुणी कौतुकाचा विषय ठरत आहे. 

जळगाव : घरातल्या केरसुणीची जागा लांबलचक झाडून घेतली.. मात्र, लक्ष्मीपूजनाला केरसुणीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.. ग्रामीण भागात आजही केरसुणीने घर झाडले जात असले तरी "वायफाय'च्या जमान्यातील शहरांमध्ये मात्र या केरसुणीने देव्हाऱ्यात जागा मिळवलीय.. देव्हाऱ्यात ठेवून पूजता येईल, अशी चिमुकली केरसुणी करण्याची कलाकुसरही एका निराधार महिलेने आत्मसात केली असून, तिची ही केरसुणी कौतुकाचा विषय ठरत आहे. 
लता दिनेश सुरळकर. तीस वर्षीय महिला. मूळची जळगावचीच, आठ वर्षांपूर्वी विवाह झाला. पण, पतीने सोडून दिल्यानंतर ती पुन्हा सात वर्षांच्या मुलासह जळगावीच येऊन राहू लागली. माहेरची स्थितीही जेमतेम, त्यामुळे गुजराण कशी करायची? हा मोठा प्रश्‍न तिच्यासमोर होताच. पण, या स्थितीवर रडत बसण्यापेक्षा तिच्याअंगी असलेल्या कलेद्वारे उदरनिर्वाह चालवायचा निश्‍चय लताने केला. 

केरसुणीची कलाकुसर 
एरवी शहर, महानगरांतील घरांमध्ये झाडण्यासाठी लांबलचक झाडू वापरला जातो, केरसुणी तर हद्दपार झालेली. लक्ष्मीपूजनाला पूजा करण्यापुरते केरसुणीचे महत्त्व. पण ज्या शिंदीच्या काड्यांनी ही केरसुणी बनवली जाते, त्याच काड्यांवर कलाकुसर करून देव्हाऱ्यात ठेवता येईल, अशी केरसुणी बनविण्याची कला लताच्या अंगी होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून ती या केरसुणी बनवते. 
 
अशी बनते चिमुकली केरसुणी 
मोठ्या केरसुणी ज्या शिंदीच्या काड्यांपासून बनविल्या जातात, त्याच काडीच्या साहाय्याने ही लहान केरसुणी बनवली जाते. काड्या सुईच्या साहाय्याने बारीक करून घेतल्यानंतर त्या अत्यंत सूक्ष्मपणे एकमेकांमध्ये विणल्या जातात. त्यासाठी नायलॉनचा लाल किंवा हिरवा धागा वापरला जातो. एक केरसुणी बनवायला तिच्या प्रकारानुसार अर्धा ते दीड तास लागतो. अवघ्या दोन-तीन सेंटीमीटरच्या या चिमुकल्या केरसुणींमध्ये साधी, कमळाची आणि गुंफलेली असे तीन प्रकार आहेत. या केरसुणीची पूजा करून ती पर्स, वॉलेटमध्ये ठेवली तर लक्ष्मी प्रसन्न राहते, असा समज आहे. त्यामुळे ही केरसुणी रचनेनुसार 251, 151, 101 रुपयांना विकली जाते. 

देवरुपी केरसुणी बनविणारी एकमेव 
या केरसुणीला देव्हाऱ्यात ठेवून तिची पूजाही केली जाते. त्यामुळे देवरुपी केरसुणी म्हणून तिची ओळख आहे. अशाप्रकारची केरसुणी बनविणारे अत्यंत दुर्मिळ. खानदेश, उत्तर महाराष्ट्रात तर केवळ आपल्यालाच ही केरसुणी बनविता येते, असे लता सुरळकर दाव्याने सांगतात. अशी अनोखी कला अंगी असूनही त्याबाबत कुणाला माहिती नाही. ही केरसुणीच लताबाईच्या जगण्याचा आधार असल्याने नागरिकांनी त्यासाठी मोबाईल क्रमांक 9921850370 यावर संपर्क साधावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon kersuni lata surlkar