खडसे हरले, खडसे जिंकले

शुक्रवार, 4 मे 2018

जळगाव : विरोधी पक्षात काम करीत विधिमंडळात सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम एकनाथ खडसे करीत होते. त्यामुळे राज्यात ते भाजपचा चेहरा ठरले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर खडसेंना चांगले भवितव्य असेल, असे भाकीत करण्याची कुणा ज्योतिषाची गरजही नव्हती. त्यानुसार त्यांना तब्बल दहा खात्याचे मंत्रिपद मिळालेही. मात्र, अचानक खडसेंवर एकामागून एक आरोप होत गेले. त्याच गर्तेत ते अडकले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे त्यांच्यावर आरोप विरोधकांनी केले नाहीत, तर पक्षांतर्गत हे वारे घोंघावले. त्यातच त्यांना हार मानावी लागली.

जळगाव : विरोधी पक्षात काम करीत विधिमंडळात सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम एकनाथ खडसे करीत होते. त्यामुळे राज्यात ते भाजपचा चेहरा ठरले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर खडसेंना चांगले भवितव्य असेल, असे भाकीत करण्याची कुणा ज्योतिषाची गरजही नव्हती. त्यानुसार त्यांना तब्बल दहा खात्याचे मंत्रिपद मिळालेही. मात्र, अचानक खडसेंवर एकामागून एक आरोप होत गेले. त्याच गर्तेत ते अडकले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे त्यांच्यावर आरोप विरोधकांनी केले नाहीत, तर पक्षांतर्गत हे वारे घोंघावले. त्यातच त्यांना हार मानावी लागली. हे आरोप चुकीचे असून त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडणार, असेही ते विश्‍वासाने सांगत होते. आता ते सिद्धही झाले. दाऊदच्या पत्नीशी संवाद प्रकरणातून ते बाहेर पडले, आता भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी "एसीबी'नेच त्यांना "क्‍लीन चीट' दिली आहे. अखेर त्यांनी हा लढाही जिंकलाच. 

कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपला "भाजीपाला' पक्ष हेच संबोधण्यात येत होते, असे खडसे यांनीच वेळोवेळी सांगितले आहे. हा पक्ष वाढविण्याचे मोठे आव्हान होते. त्यावेळी नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला उमेदवार मिळत नव्हते. अशा काळात संघटन उभे करणे कठीण होते. त्यांनी आपले संपूर्ण संघटनकौशल्य पणास लावून पक्ष वाढविला. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका एवढेच नव्हे, तर जळगावची तत्कालीन पालिकाही ताब्यात घेतली होती. पुढे याच भाजपचे दोन खासदार आणि सहा आमदार अशी ताकद जिल्ह्यात निर्माण झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यानंतरही भाजपने तब्बल पाच जागांवर यश मिळविले. युती तुटल्यानंतर विधानसभेत सर्वांत जास्त जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष झाला. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची माळ खडसेंच्या गळ्यात पडणार, असे वाटत असतानाच त्यांना ती संधी मिळाली नाही. मात्र, महसूलसह दहा महत्त्वाची खाती देण्यात आली. 

स्वपक्षातच हार 
राज्यात महत्त्वाच्या दहा खात्याचा कारभार करत असताना त्यांनी अनेक निर्णय घेतले. कामात ते व्यस्त राहिले. त्यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छाही लपविली नाही. पुढे मात्र अचानक त्यांच्यावर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी संवाद केल्याचा आरोप झाला. त्यानंतर भोसरी जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचाही आरोप झाला. एकामागून एक आरोपांच्या फैरीच सुरू झाल्या. त्यामुळे मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, अशी राळ उठली. विशेष म्हणजे यामागे विरोधक नव्हते. त्यांनी कधीही खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, असे खडसे यांनीच स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा रोख स्वपक्षाकडेच होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पक्षाची उभारणी करण्यापासून तर सत्तेवर आणण्यापर्यंत संघर्ष केल्यानंतर सत्ता आल्यावर पक्षांतर्गत स्पर्धेतूनच गैरव्यवहाराचा आरोप झाला, हा त्यांचा वैयक्तिक पराभव होता. त्याचे शल्य त्यांना निश्‍चितच होते. 

संघर्षाचा विजय 
मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांनी आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध करण्यासाठी संघर्ष सुरू केला. त्यांच्यावरील दाऊद प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली, तर भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती झोटिंग समितीची नियुक्ती झाली. याशिवाय न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंध विभागासही चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या सर्व चौकशांना खडसे शांतपणे सामोरे गेले. त्यांनी आपली बाजू मांडली. याशिवाय त्यांनी वेळोवेळी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध जनतेतही मत मांडले. त्यांनी आपल्या पक्षाविरुद्धही आवाज उठविला त्यामुळे ते भाजप सोडणार, असेही बोलले जाऊ लागले. परंतु, न डगमगता त्यांनी थोडथोडका नव्हे, तर दोन वर्षे संघर्ष केला. मात्र, आता त्यांच्यावरील एकेका आरोपातून ते सहीसलामत बाहेर पडले आहेत. भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत विभागाने न्यायालयात दिलेला "क्‍लीन चीट' अहवालामुळे ते निर्दोष होणार, हेच दिसत आहे. त्यामुळे खडसे यांचा हा विजय आहे. वैयक्तिक संघर्षातही ते जिंकले आहेत. भट्टीत तावून सुलाखून काढल्यानंतर सोन्याला अधिक चकाकी येते, हेच खडसे यांच्या बाबतीत आगामी काळात दिसणार आहे. हाच विजय आगामी काळात त्यांना आणि भाजपलाही बळ देणार, हे निश्‍चित आहे.

Web Title: marathi news jalgaon khadse