धीरोदात्त संघर्षयात्री ः एकनाथराव खडसे 

धीरोदात्त संघर्षयात्री ः एकनाथराव खडसे 

जळगाव जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. (कै.) बाळासाहेब चौधरी, के. एम. पाटील, डी. डी. चव्हाण, असे दिग्गज कॉंग्रेसचे नेते होते; तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ होता. अशा स्थितीत भाजपचा विस्तार करायवयाचा, असे मोठे आव्हान होते. मात्र, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी कार्य केले. त्यामुळे जिल्ह्यात आज सहकारी संस्थांसह सर्वच क्षेत्रांत पक्षाचे वर्चस्व आहे. मात्र, त्यासाठी एकनाथराव खडसे यांना कठोर संघर्ष करावा लागला. राजकीय जीवनासोबतच व्यक्तिगत जीवनातही त्यांना संघर्षाशी सामना करावा लागला. मात्र, तो न डगमगता त्यांनी परतवून लावला आणि तो आजही सुरूच आहे. ते यावरही मात करून यश मिळवितील, एवढा त्यांच्यात आजही विश्‍वास दिसून येतो. त्यामुळे ते खऱ्याअर्थाने "संघर्षयात्री' आहेत... 


घराण्यात कोणीही राजकारणात नसताना तसेच सत्तेत नव्हे; तर विरोधी पक्षात आणि ज्या पक्षाला सर्वसामान्य जनतेत फारसा परिचय नाही, त्या पक्षाची ध्येयधोरणे ग्रामीण लोकांना समजून सांगून त्यांना पक्षकार्यात सहभागी करून घेणे, म्हणजे साधे काम नव्हेच. जिल्ह्याच्या एका टोकाला असलेला मुक्ताईनगर तालुका आणि याच तालुक्‍यात कॉंग्रेसची पाळेमुळे अधिक घट्ट रोवलेली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे माहेर याच तालुक्‍यातील बोदवड येथे असल्याने, त्यांचा हा मतदारसंघ होता. शेजारीच कॉंग्रेसचे दिग्गज नेते (कै.) मधुकरराव चौधरी यांचा रावेर मतदारसंघ, अशा स्थितीत भाजपचे "कमळ' फुलविण्याचे आव्हान कठीणच. कोणत्याही आव्हानास समोरे जाण्याची ताकद असणाऱ्या खडसेंनी आपले संघटनकौशल्य, नीडरपणा या बळावर सत्तेतील दिग्गजांशी सामना करीत सर्वसमान्यांना आपलेसे केले. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण असल्यामुळे सर्वप्रथम त्यांनी ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु हे करीत असताना त्यांना एकट्यालाच लढा द्यावा लागला. कारण, त्यावेळी पक्षाकडे कार्यकर्तेच नव्हते. त्यावेळी साध्या हातगाडीवर ध्वनिक्षेपक ठेवून ते गल्लोगली जाऊन भाषण देत होते. लोकांना प्रश्‍नांची जाणीव करून देत आणि ते प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. केवळ आंदोलन करून प्रश्‍न सुटत नाहीत, तर शासनदरबारीही ते सोडवून घेतले पाहिजेत. यासाठी खडसे त्या काळात स्वत: तहसील कार्यालयात, वेळप्रसंगी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवून आणत असत. त्यातून त्यांच्यावर पर्यायाने पक्षकार्यावर जनतेचा विश्‍वास बसू लागला आणि एकेक कार्यकर्ता पक्षाशी जोडला जाऊ लागला. 
पक्ष वाढवायचा असल्यास जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासोबतच स्थानिक निवडणुकीतही सहभाग घेऊन पक्षाला यश मिळविणे अपेक्षित असते. त्याच सूत्रानुसार त्यांनी मुक्ताईनगर ग्रामपंचायतीत प्रथम यश मिळवून ते सरपंच झाले. कॉंग्रेसच्या ताब्यातून त्यांनी प्रथम ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात घेतली. तेथे त्यांना पहिले यश मिळाले. मात्र, एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी तालुक्‍यातील प्रश्‍नांकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने सुरू केली. त्यातून ते मुक्ताईनगर पंचायत समिती सदस्यपदी ते निवडून आले. 
पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न त्यांनी मांडले. एवढेच नव्हे; तर निधी उपलब्ध करून पदाच्या माध्यमातून जनतेची कामे कशी करावयाची, याचा त्यांनी धडा घालून दिला. पद मिळाले म्हणून ते गप्प बसले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर त्यांनी आवाज उठविण्यास प्रारंभ केला. त्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा, रस्त्यावर आंदोलन त्यांनी पक्षाच्या माध्यमातून केले. त्यामुळे शेतकऱ्यांतही त्यांनी विश्‍वास निर्माण केला. 1990 मध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांना पक्षातर्फे उमेदवारी मिळाली. आपले वक्तृत्व आणि आंदोलनाच्या बळावर ते निवडूनही आले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुक्ताईनगर मतदारसंघात परंपरागत कॉंग्रेसला त्यांनी धक्का दिला. 
प्रतिभाताई पाटील यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्याकडे सर्वच पक्षांचे लक्ष गेले; परंतु या यशाने ते हुरळले नाहीत. त्यांनी आमदार म्हणून कार्य सुरू करण्यासोबतच जिल्ह्यातील जनतेचे प्रश्‍न मांडण्यास प्रारंभ केला. विविध प्रकल्पांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू केली. वेळप्रसंगी शासनाच्या मंत्र्यांना घेरावा घातला. त्यांच्या या आंदोलनाला जनतेचाही पाठिंबा मिळत गेला. याच आंदोलनातून पुढे पक्षविस्तारही होत गेला. जिल्हा परिषदेत भाजपचे अध्यक्ष झाले, तर 1995 च्या निवडणुकीत ते निवडून आलेच. शिवाय, जिल्ह्यातही भाजपच्या आमदारांचे संख्याबळही वाढले. त्यावेळी राज्यात भाजप- शिवसेनेच्या सत्तेत त्यांना अर्थ-नियोजन, उच्च व तंत्रशिक्षण, पाटबंधारे लाभक्षेत्र विकास मंत्रिपदही मिळाले. मंत्रिपदाच्या काळातही त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले. 1999 मध्ये भाजपची सत्ता जाऊन पुन्हा आघाडीची सत्ता आली. मात्र, त्यांनी शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन सुरूच ठेवले. 2009 मध्ये त्यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळाले आणि त्यांनी जनतेच्या प्रश्‍नांसाठी राज्य अक्षरश: पिंजून काढले. विधानसभेत सरकारचे वाभाडे काढून मंत्र्यांना अक्षरश: धारेवर धरले. पक्षाच्या माध्यमातूनही रस्त्यांवरही आंदोलन केले. त्यामुळे जनतेत पक्षाबाबत विश्‍वासही त्यांनी निर्माण केला. एवढेच नव्हे; तर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातही भाजपचा झेंडा त्यांनी फडकावला. मात्र, या राजकीय संघर्षात त्यांना व्यक्तिगत जीवनातही संघर्षच करावा लागला. त्यांचे पुत्र निखिल खडसे विधान परिषद निवडणुकीत उभे राहिले. त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांचे निधन झाले; परंतु या कठीण काळातील संकटांशीही त्यांनी सामर्थ्याने सामना केला. याच काळात त्यांना आजारही झाला; परंतु त्यावरही त्यांनी मात केली. 
2009 मध्ये विधानसभा निवडणुका आल्या. त्यावेळी भाजप- शिवसेनेत वाद झाला. तब्बल 25 वर्षांनंतर शिवसेनेची साथ सोडत भाजपने स्वतंत्र निवडणुका लढविण्याबाबत निर्णय घेतला. विशेष म्हणजे राज्यात खडसे यांनी पक्षाच्या वतीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यामुळे पक्षाला यश मिळविण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आली. मात्र, ते डगमगले नाहीत. राज्यभर त्यांनी दौरा केला. या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले आणि राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून आला. 
भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे निश्‍चित झाले होते. त्यामुळे हे पद त्यांना मिळण्याचीही चर्चा सुरू झाली होती; परंतु त्यांना कृषिमंत्रिपदासोबत बारा खाती देण्यात आली. मात्र, 4 जून 2016 ला गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला; परंतु ते डगमगल्याचे दिसले नाही. आपण चौकशीतून निर्दोष होऊच, असा त्यांचा ठाम विश्‍वास होता. पक्षकार्यासाठी अगोदरच संघर्ष करणाऱ्या खडसेंना आपल्या स्वत:साठीच संघर्ष करण्यासाठी वेळ प्रथमच आली होती. मात्र, आपल्या आत्मविश्‍वासाच्या बळावर ते त्याला सामोरे गेले. तब्बल दोन वर्षे चौकशीचा संघर्ष केला. गैरव्यवहारासह इतर आरोपांतून ते बाहेर पडले. तरीही पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गैरव्यवहार आरोपांतून बाहेर पडल्यानंतर त्यांना पक्षाने सन्मानाने पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असे कार्यकर्त्यांना वाटते. मात्र, खडसे म्हणतात, "आपण पदासाठी कधीच संघर्ष केला नाही. जनतेसाठी आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढलो. त्यातूनच आपल्यापुढे जाता आले. त्यामुळे यापुढेही जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढणारच आहोत. त्यांचे प्रश्‍न सुटले. यातच आपल्याला समाधान आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला जे घडायचे, ते घडेल. मात्र, आपला संघर्ष सुरूच राहणार आहे.' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com