खडसेंची प्रतीक्षा, महाजनांची चढती कमान 

खडसेंची प्रतीक्षा, महाजनांची चढती कमान 

सरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आरोपात "क्‍लीन चीट' मिळाल्यानंतर खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असे चित्र होते. मात्र, वर्षाच्या शेवटपर्यंत त्याबाबत प्रतीक्षाच राहिली आहे. तर दुसरीकडे राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीची चढती कमान ठरली आहे. राज्यात सरकार विरोधात झालेल्या आंदोलनात त्यांनी मध्यस्थी करून समझोता घडवून आणला आणि सरकारला अडचणीतून बाहेर काढले. त्यामुळेच त्यांना संकटमोचक बिरुदावली लागली. तर पालघर पोटनिवडणुकीपासून त्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या विजयाचा वारू जळगाव, धुळे आता नगर महापालिकेतही सत्ता मिळवून पुढे चाल करीत आहे. त्यांच्या या नेतृत्वाची चढती कमान कायम राहिली आहे. 

वाद, संघर्षातही भाजपचे यश 
सरत्या वर्षात भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये वाद कायम राहिला. परंतु त्यातही महापालिकेत सत्ता मिळविण्यात त्यांना यश आले आहे. पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद अधिकच वाढला आहे. दुसरीकडे त्यांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पाठविण्यात आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तो शमविण्यात यशस्वी झाले तर नाहीच, परंतु त्यांचाच आता वेगळा तिसरा गट झाला आहे. मात्र पक्षाला यशावरच त्यांचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर नगरपरिषदेत पक्षाची सत्ता आली. तर जळगाव महापालिकेतही भाजपने सत्तेचा झेंडा फडकविला. तर वर्षाच्या सरतेशेवटी शेंदुर्णी नगरपरिषदही पक्षाच्या ताब्यात आली. 
 
बाजार समिती वगळता सेनेला अपयश 
शिवसेनेने जळगाव बाजार समितीत आपल्या पक्षाच्या सभापती केला ही त्यांची यशाची बाजू आहे. त्या शिवाय सेनेला जिल्ह्यात फारसे यश मिळालेले नाही. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव महापालिकेची निवडणूक लढविण्यात आली. यात सत्ता टिकविण्यात पक्षाला पूर्णपणे अपयश आले. जामनेर, मुक्ताईनगरातही पक्ष काही आपले अस्तित्व दाखवू शकलेला नाही. 
 
"राष्ट्रवादी'त जिल्हाध्यक्ष बदल 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदात बदल करण्यात आला. आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची असमर्थतता दाखविल्यामुळे जिल्हाध्यक्षपदात बदल अपरिहार्य होता. या पदाच्या शर्यतीत गुलाबराव देवकर, राजीव देशमुख यांच्यासह अनेक जण होते. परंतु पक्षश्रेष्ठींनी माजी अध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव महापालिकेतील अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यांचा एकही नगरसेवक यावेळेस निवडून आलेला नाही. जामनेर पालिकेतही पक्षाची हीच अवस्था आहे. तर शेंदुर्णी नगरपरिषदेतही पक्ष फारसे काही करू शकलेला नाही. पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात विविध आंदोलने करण्यात आली एवढीच काय ती जमेची बाजू 
 
कॉंग्रेसचे "ये रे माझ्या मागल्या'...! 

कॉंग्रेस पक्षालाही फारसे काही हाती गवसलेले नाही. जिल्ह्यात झालेल्या कोणत्याही निवडणुकीत पक्षाला यश मिळालेले नाही. तर जळगाव महापालिकेत यावेळी एक नगरसेवक निवडून आणण्यात त्यांना यश मिळालेले नाही. कॉंग्रेस पक्षात असलेले अंतर्गत वाद काही अंशी कमी झाले आहेत एवढीच काय ती जमेची बाजू आहे. पक्षाच्या राज्यस्तरावरून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा फैजपूर येथून सुरू करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तर पक्षातर्फे जनहितासाठी शासनाच्या विरोधात विविध आंदोलने करण्यात आली. पक्षाने आंदोलनाच्या माध्यमातून संघर्षाचा पवित्रा कायम ठेवला. मात्र पक्षाला अद्यापही यशाची प्रतीक्षा कायम आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com