रक्षा खडसेंच्या विजयाची अपेक्षा.. पण, एकनाथराव खडसेंचे पुढे काय? 

रक्षा खडसेंच्या विजयाची अपेक्षा.. पण, एकनाथराव खडसेंचे पुढे काय? 

माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला. एक वेळ अशी होती, की त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना पक्षातर्फे पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे ते पक्ष सोडतील, अशी चर्चा सुरू होती; परंतु पक्षातर्फे रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली. मुख्यमंत्रीही प्रचारास आले. त्या निवडून येतील, असा पक्षाचा दावाही आहे. मात्र, आता प्रश्‍न असा आहे, की नेहमीच संघर्ष करणारे एकनाथराव खडसे यांचे पुढे काय होणार किंवा ते काय भूमिका घेणार? 


भाजपला राज्यात मोठे करण्यात एकनाथराव खडसे यांचाही मोठा वाटा आहे. कॉंग्रेसच्या जळगाव जिल्ह्यातील या बालेकिल्ल्यात सत्तेचे "कमळ' फुलविण्याचे काम खडसे यांनी केल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी त्यांना जिल्ह्यातील दिग्गज कॉंग्रेस नेत्यांशी संघर्ष करावा लागला. राज्यात युती तोडून स्वतंत्रपणे विधानसभा लढण्याचा, त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर दावा सांगण्याचा धाडसी निर्णय पक्षाच्या माध्यमातून खडसे यांचाच होता. त्यामुळे केंद्रात व राज्यात खडसे यांचा पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही दबदबा वाढला होता. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर बारा खात्यांचे ते कॅबिनेट मंत्री होते; परंतु भोसरी जमीन खरेदीप्रकरणी त्यांच्यावर कथित गैरव्यवहाराचा आरोप झाला. त्यातून त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. 

दरम्यान, खडसे यांना गेल्या अडीच वर्षांत पक्षांतर्गतच मोठा संघर्ष करावा लागला. पक्षांतर्गत षडयंत्र करून आपल्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप स्वत: त्यांनीच केला. त्यानंतर जाहीर सभेत आणि विधिमंडळातही त्यांनी सरकारविरोधात तोफ डागली होती. त्यांच्यावरील आरोपाची चौकशी होऊन "क्‍लीन चिट' मिळाल्याचा त्यांनी दावा केला आहे. त्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले नाही. यावरून पक्षनेतृत्वावर त्यांनी थेट नाराजी दाखविल्यामुळे त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा भाजपची उमेदवारी मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी दिली. 

राज्यात निवडणुकीच्या काळात खडसे हे पक्षाचे स्टार प्रचारक असतील, असेही सांगण्यात येत होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात राहावे लागले. त्यामुळे रावेर मतदारसंघातही रक्षा खडसेंच्या निवडणुकीच्या प्रचारात ते शेवटच्या दिवसात सहभागी झाले. या मतदारसंघात भाजपला यश मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांचा विजय म्हणजे एकनाथराव खडसेंचा विजय असेल. या यशामुळे राज्यातील राजकारणात खडसे यांचा पुन्हा वरचष्मा होईल; परंतु खडसे यांची भूमिका पक्षात त्याच जोमाने कार्य करण्याची असेल काय? लोकसभेनंतर अवघ्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका आहेत. पक्षाला राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यावेळी गेल्या पाच वर्षांतील सत्तेतील कामांचा लेखाजोखा मांडावा लागणार आहे. शिवाय, राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक असणार आहेत. त्यांचे आक्रमण थोपविण्यासाठी आक्रमक नेत्यांची फळी उभी करावी लागणार आहे. अशा स्थितीत खडसे यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. गेल्या अडीच वर्षांत मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिलेले आणि आपल्याच सरकारला विधिमंडळात सडेतोड बोल सुनावणारे खडसे यांनाच मंत्रिमंडळाने किती चांगले काम केले आहे, हे सांगावे लागणार आहे; परंतु खडसे पक्षासाठी हा संघर्ष पुन्हा करतील काय? 

भाजपचे जिल्ह्यातील चित्र आज बऱ्याचअंशी बदलले आहे. बदलत्या समीकरणात आज युतीच्या माध्यमातून शिवसेनाही जवळ आली आहे. अशा स्थितीत खडसे यांना आपल्या भूमिकेतही बदल करावा लागणार आहे; परंतु खडसे यांनी केलेला राजकीय संघर्ष पाहता कठीण परिस्थितीवर आपल्या भूमिकेशी ठाम असतात, हे गेल्या अडीच वर्षांतील पक्षांतर्गत संघर्षातून दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळातही खडसे हे आपला जुनाच संघर्ष पुढे कायम ठेवून चालण्याची शक्‍यता आहे. यात मात्र ते केवळ सहा महिन्यांसाठी पुन्हा मंत्रिमंडळात जाण्याबाबत फारसे सहमत नसतील; परंतु पक्षात पुन्हा दरारा निर्माण करतील. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय सत्तापटलाच्या गणितात ते आपले वेगळे अस्तित्व दाखवतील, एवढे मात्र निश्‍चित...! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com